Pune Water Cut News: पुण्यात अनेक भागात ५ दिवस पाणी नाही; टँकरने पुरवठा, पाणी असूनही नियोजनात त्रुटी, नगरसेवक संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 11:14 IST2026-04-25T11:11:41+5:302026-04-25T11:14:31+5:30

Pune Water Cut News 'धरण उशाला अन् कोरड घशाला' अशी परिस्थिती असल्याचे सांगत अनेक भागांत ५ ते ६ दिवस पाणी येत नसल्याची गंभीर तक्रार नगरसेवकांनी केली

Pune Water Cut News Many areas in Pune have no water for 5 days tankers supplied water but there were planning errors, corporators were angry | Pune Water Cut News: पुण्यात अनेक भागात ५ दिवस पाणी नाही; टँकरने पुरवठा, पाणी असूनही नियोजनात त्रुटी, नगरसेवक संतापले

Pune Water Cut News: पुण्यात अनेक भागात ५ दिवस पाणी नाही; टँकरने पुरवठा, पाणी असूनही नियोजनात त्रुटी, नगरसेवक संतापले

पुणे : शहरातील जलकेंद्राच्या विविध दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी जाहीर केलेले 'पाणी बंद' शुक्रवारी दुपारपर्यंत लांबले. परिणामी महापालिकेच्या नियोजनाचा फज्जा उडाल्याने पुणेकरांचे प्रचंड हाल झाले. त्याचे तीव्र पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. संतप्त नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत प्रशासनाच्या नियोजनावर जोरदार टीका करत प्रश्नांचा भडीमार केला.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच भाजपचे नगरसेवक कुणाल टिळक यांनी शुक्रवारी दुपारपर्यंतही पाणी मिळाले नसल्याची तक्रार केली. तसेच टँकरही उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली. त्यामुळे पाणीपुरवठा उशिरापर्यत सुरू ठेवावा,” अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर नगरसेविका स्वरदा बापट, धनश्री कोल्हे यांनीही आक्रमक पवित्रा घेत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याबद्दल प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. नगरसेवक कासिफ सय्यद यांनी मिठानगर, अश्रफनगर, कौसरबाग व एनआयबीएम परिसरात केवळ एक तास पाणी येत असून तेही दूषित असल्याचे सांगत प्रशासनावर टीका केली. भाजपचे नगरसेवक योगेश मुळीक म्हणाले, वडगावशेरी भागात सर्व लाईनचे काम पूर्ण केले आहे. सर्व टाक्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, तरीही पाणीपुरवठा केला जात नाही. किती दिवस सोसायट्यांना टँकरचे पाणी घ्यायचे.? सोसायट्यांना चार-चार, पाच-पाच लाखांचे बिल येत आहेत. त्या सोसायट्यांनी हा फटका का सहन करायचे, अधिकारी नुसती फिरवाफिरवीची उत्तरे देतात.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे गटनेते काका चव्हाण म्हणाले, समान पाणीपुरवठा योजना कधी सुरू झाली. पण दहा वर्षांनंतरही या योजनेचे काम पूर्ण झाले नाही. समाविष्ट गावातील नागरिकांना फक्त अर्धा तास पाणी दिले जाते. प्रति माणसी ३० लिटर पाणी दिले जात आहे, याकडे लक्ष वेधले. नगरसेवक दादा कोद्रे यांनी केशवनगर, शेवाळवाडी व मांजरी भागात मंजूर क्षमतेपेक्षा अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप केला. नगरसेवक सुनील शिंदे यांनी धरणात पुरेसे पाणी असूनही नियोजनात त्रुटी असल्याचे सांगितले. नगरसेवक पुनीत जोशी यांनी पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांना एसएमएसद्वारे माहिती देण्याची मागणी केली. नगरसेविका अनिता इंगळे यांनी “धरण उशाला अन् कोरड घशाला” अशी परिस्थिती असल्याचे सांगत अनेक भागांत पाच ते सहा दिवस पाणी येत नसल्याची गंभीर तक्रार केली. गळती, अपूर्ण पाण्याच्या टाक्या आणि टँकर व्यवस्थेतील गोंधळावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

एकाच दिवसात ४५ प्रकारची महत्त्वाची तांत्रिक कामे करण्याचे नियोजन होते. यामध्ये जुन्या पाइपलाइनची दुरुस्ती आणि व्हॉल्व्ह बदलण्याच्या कामांचा समावेश होता. मात्र, शुक्रवारी पहाटे ६ वाजेपर्यंत ही कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. विशेषतः पर्वती येथील 'फ्लो मीटर' बसवण्याचे काम अपूर्ण राहिल्याने पाणी सोडण्यास विलंब झाला. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कामे पूर्ण करून ३ वाजेपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्वपदावर आणला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी सांगितले.

Web Title : पुणे में पानी की कटौती: खराब योजना से पार्षदों में आक्रोश

Web Summary : पुणे में मरम्मत में देरी के कारण पानी की कमी हुई। पार्षदों ने खराब योजना, अपर्याप्त टैंकर आपूर्ति और पर्याप्त जल भंडार के बावजूद असमान वितरण के लिए प्रशासन की आलोचना की। काम में देरी से दोपहर तक पानी की बहाली में देरी हुई।

Web Title : Pune Faces Water Cut: Inefficient Planning Sparks Outrage Among Corporators

Web Summary : Pune residents faced water shortages due to delayed repairs. Corporators criticized the administration for poor planning, inadequate tanker supply, and unequal distribution despite sufficient water reserves. Work delayed water restoration until afternoon.