वडगाव मावळ : राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील काही नेते भाजपमध्ये जाणार असून, त्यांच्यासोबत १५ आमदारही जाणार असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पवार यांना प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष अधिक मजबुतीने पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
आमदार शेळके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवारांवर टीका करत म्हटले की, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवार सातत्याने राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करत आहेत. इतके खोटे सातत्याने बोलले जात आहे की, महाराष्ट्रातील जनतेलाही ते खरे वाटू लागले आहे.
काही आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा करत रोहित पवारांनी भविष्यवाणीचा नवीन धंदा सुरू केला आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष खंबीरपणे उभा आहे. सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते पक्ष मजबूत करण्यासाठी काम करत आहेत, असे शेळके यांनी स्पष्ट केले.
प्रश्न मार्गी लागत असताना दुसरा पर्याय का शोधू?
आमच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आवश्यक निधी मिळत आहे. स्थानिक प्रश्न मार्गी लागत असताना आम्ही दुसरा पर्याय का शोधू? रोहित पवार राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहेत. बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार द्यावा, यासाठी त्यांनी हट्ट धरला होता. जर रोहित पवारांना नैतिकतेबद्दल बोलायचे असेल, तर त्यांनी आधी जाहीर करावे की, ते भविष्यात सुनेत्रा पवार यांच्याविरोधात कधीही उभे राहणार नाहीत. २०२९ मध्ये ते स्वतः काँग्रेसकडून बारामतीतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, असा दावा सुनील शेळके यांनी केला.
Web Summary : Sunil Shelke refuted Rohit Pawar's claim of NCP MLAs joining BJP. Shelke asserts NCP is strong under Sunetra Pawar, accusing Rohit of undermining party unity and planning to contest against her in the future.
Web Summary : सुनील शेलके ने रोहित पवार के एनसीपी विधायकों के भाजपा में शामिल होने के दावे का खंडन किया। शेलके ने कहा कि सुनेत्रा पवार के नेतृत्व में एनसीपी मजबूत है, रोहित पर पार्टी एकता को कमजोर करने और भविष्य में उनके खिलाफ चुनाव लड़ने की योजना बनाने का आरोप लगाया।