Sharad Pawar on PM Modi Appeal: देशातील सध्याची परिस्थिती गंभीर आहे आणि अशा वेळेला देशाच्या सगळ्या नेत्यांची बैठक बोलवावी आणि त्याला प्रधानमंत्र्यांनी स्वतः हजर राहावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सुचवले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. "गेल्या ३-४ वर्षात सर्वपक्षीय बैठका झाल्या, पण त्यातील एकाही बैठकीत पंतप्रधान नव्हते. पण सध्या एकंदर स्थिती गंभीर आहे असे सांगण्याचे काम मुख्यमंत्री-प्रधानमंत्री करत आहेत, तर तितक्याच गांभीर्याने सगळ्यांनी ही परिस्थिती समजून घ्यावी," असेही पवार म्हणाले.
मुख्यमंत्री राहुल गांधींबद्दल बोलले ते अयोग्य
"सकाळपासून टीव्हीवर बघतोय कुणी मोटारसायकलवरुन जात आहे, कोणी चालत जात आहे, एकाने तर जाहीर केले की मी मंत्री आहे आणि माझ्या गाड्या मी कमी केल्या. त्या १७ होत्या, आता १७ वरून ८ वर आलो. मला तर धक्काच बसला की १७ गाड्या होत्या आणि कमी केल्यानंतर ८ वर आणल्या. याचा अर्थ या सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन गांभीर्याचा असला पाहिजे. अशी स्थिती या आधी देशात झाली नव्हती असे नाही, पण आता काळजी घ्यायला हवी. या वेळेला मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांनीसुद्धा आपली भाषा व्यवस्थित वापरली पाहिजे. राहुल गांधींच्या संबंधी मुख्यमंत्र्यांनी जे शब्द वापरले, ते अयोग्य होते. राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत आणि तेही संसदेत आहेत. विरोधी पक्ष नेता हे संवैधानिक पद आहे आणि ते लोकांमधून निवडून येते. त्यामुळे अशी भाषा या पदावर असलेल्या व्यक्तीसंबंधी वापरणे चुकीचे आहे," असे शरद पवार म्हणाले.
परिस्थिती गंभीर आहे, तर सगळ्या पातळीवर दाखवली पाहिजे!
"रुपया खाली का येतो, याचा विचार केला पाहिजे. आज इराणचा जो विषय आहे त्याचा परिणाम नक्कीच आहे. पण हा परिणाम तेवढा आहे का? निवडणुकीचे निकाल लागून गेले आणि त्यानंतर केंद्र सरकारने हे सगळे निर्णय घेतले. निवडणुका सुरू होते, तेव्हा याचे गांभीर्य नव्हते आणि याची जनतेत जागृती करावी असे वाटले नाही. पंतप्रधान सोमनाथच्या मंदिरात गेले, तिथे जाऊन विमान उडवले, ६ विमाने त्या ठिकाणी घेऊन शो केला. परिस्थिती गंभीर आहे तर सगळ्या पातळीवर दाखवली पाहिजे. सोनेखरेदी करू नका हे सांगणे याचा अर्थ एकच आहे की आपल्या रुपयाची जी किंमत आहे, ती घसरू द्यायची नाही. हा निर्णय चुकीचा आहे असे मी म्हणत नाही. पण एका बाजूला हे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला वेगळेच सुरू आहे. हे योग्य नाही," याकडे पवारांनी लक्ष वेधले.
Web Summary : Sharad Pawar urges an all-party meeting, with PM's presence, given the grave national situation. He criticized the CM's remarks about Rahul Gandhi and questioned the government's handling of the economic crisis, highlighting the rupee's decline and contrasting actions.
Web Summary : शरद पवार ने गंभीर राष्ट्रीय स्थिति को देखते हुए पीएम की उपस्थिति में सर्वदलीय बैठक बुलाने का आग्रह किया। उन्होंने राहुल गांधी पर सीएम की टिप्पणी की आलोचना की और रुपये में गिरावट और विपरीत कार्यों पर प्रकाश डालते हुए आर्थिक संकट के सरकार के प्रबंधन पर सवाल उठाया।