करंदीत बिबट्या दिसताच वाजणार सायरन; शिरूर वनविभागाकडून 'बेस अलार्म सिस्टम' कार्यान्वित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 18:54 IST2026-04-26T18:54:07+5:302026-04-26T18:54:59+5:30
- परिसरात बिबट्या दिसताच सायरन वाजणार असून, ग्रामस्थांना तातडीने सावध होता येणार आहे.

करंदीत बिबट्या दिसताच वाजणार सायरन; शिरूर वनविभागाकडून 'बेस अलार्म सिस्टम' कार्यान्वित
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील करंदी येथे बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व पोलिस पाटील वंदना साबळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, वनविभागाने गावात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ''बेस अलार्म सिस्टम'' बसवली आहे. आता परिसरात बिबट्या दिसताच सायरन वाजणार असून, ग्रामस्थांना तातडीने सावध होता येणार आहे.
करंदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार बिबट्याचे दर्शन होत होते. बिबट्याने अनेकदा पशुधनावर हल्ले केले, तर काही ठिकाणी घरासमोर आणि गोठ्यांजवळ बिबट्या वावरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. यामुळे शेतकरी, मजूर आणि शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला होता. वनविभागाकडे ही यंत्रणा बसवण्याची मागणी केली होती. दरम्यान, वरिष्ठ कार्यालयाकडून निधी मंजूर होताच, धामारी रोड परिसरात ही यंत्रणा बसवण्यात आली. नुकतीच या सिस्टमची अधिकृत चाचणी घेण्यात आली. यावेळी नियतक्षेत्र वनअधिकारी सोपान अनासुने, पोलिस पाटील वंदना साबळे, आपदा मित्र महेश साबळे पाटील, राहुल ढोकले, वन्यजीव बचाव पथकाचे गणेश टिळेकर, शुभांगी टिळेकर, अमोल कुसाळकर आणि राहुल गायकवाड उपस्थित होते.
ही यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे. जेव्हा एखादा हिंस्र प्राणी कॅमेऱ्याच्या टप्प्यात येतो, तेव्हा ही सिस्टम त्याचे विश्लेषण करून त्वरित सायरन वाजवते. यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा वस्तीवरील नागरिकांना बिबट्या जवळ असल्याची पूर्वसूचना मिळेल. शिरूर तालुक्यात आतापर्यंत एकूण १७ ठिकाणी अशी बेस अलार्म सिस्टम बसवण्यात आली आहे. इतर काही गावांबाबतचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले असून, निधी प्राप्त होताच तिथेही ही यंत्रणा बसवली जाईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी नीळकंठ गव्हाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.