भोर : भोर नगरपालिकेतील विविध विकासकामांच्या मंजुऱ्या, उद्घाटन व भूमिपूजनावरून सध्या श्रेयवादाचा तीव्र वाद पेटला असून, या संघर्षात अधिकारी-कर्मचाऱ्यांना रोषाचा सामना करावा लागत आहे. परिणामी पालिकेतील वातावरण तणावपूर्ण बनले असून प्रशासनात नाराजीचा सूर उमटत आहे.
एसटी स्टँड परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज शॉपिंग सेंटरचे दोन वेळा उद्घाटन झाल्याने हा वाद चिघळला. आजी-माजी आमदारांतील प्रतिष्ठेच्या लढाईत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष गटांनी वेगवेगळे कार्यक्रम घेतल्याने आमदार शंकर मांडेकर आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यातील संघर्ष तीव्र झाला. या वादातून दोन्ही बाजूंनी खालच्या पातळीवर टीका-टिप्पणी झाल्याने वातावरण अधिकच तापले आहे.
नगरपालिकेच्या संकुलाला ‘श्री छत्रपती संभाजीराजे व्यापारी संकुल’ असे नाव देण्यात आले. २२ एप्रिल रोजी माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते या संकुलाचे तसेच ‘राजमाता जिजाऊ जलतरण तलावा’चे उद्घाटन करण्यात आले. मात्र या कार्यक्रमपत्रिकेत नगराध्यक्ष रामचंद्र आवारे व काही पदाधिकाऱ्यांची नावे नसल्याने नाराजी निर्माण झाली. या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, उपनगराध्यक्षा जयश्री शिंदे, गटनेते अमित सागळे उपस्थित होते.
याच्या दुसऱ्याच दिवशी, २३ एप्रिल रोजी रात्री आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते त्याच व्यापारी संकुलाचे पुन्हा उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, मुख्याधिकारी गजानन शिंदे, गटनेते केदार देशपांडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमात सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता.
व्यापारी संकुलासाठी दोन्ही आमदारांच्या कार्यकाळात निधी मिळाल्याचे सांगितले जात असले, तरी श्रेयवादामुळे वाद निर्माण झाला आहे. याचबरोबर शहरातील अभ्यासिका, वाचनालय आणि व्यायामशाळेसाठी मंजूर अडीच कोटी रुपयांच्या निधीच्या वापराबाबतही मतभेद असून, जागेच्या प्रश्नावरून तो निधी अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, नगरपालिकेच्या सत्तासमीकरणामुळेही तणाव वाढला आहे. नगराध्यक्ष व काही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), तर बहुसंख्य नगरसेवक भाजपचे असल्याने निर्णय प्रक्रियेत ताळमेळ बसत नसल्याचे दिसत आहे. परिणामी विकासकामे, ठराव व मंजुऱ्यांवरून सातत्याने वाद निर्माण होत आहेत.
या सर्व घडामोडींमध्ये अधिकारी व कर्मचारी दोन्ही बाजूंच्या दबावाखाली सापडले आहेत. विविध कामांसाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असून, रात्री-अपरात्री फोन करून दमबाजी केली जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे पालिकेतील कर्मचारी वर्गात अस्वस्थता व नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे.
Web Summary : Bhor Municipality faces tension as credit wars erupt over project inaugurations. A shopping center was inaugurated twice by rival politicians, escalating conflict. Disagreements over funds and political dynamics further strain the administration, pressuring employees.
Web Summary : भोर नगरपालिका में परियोजनाओं के उद्घाटन को लेकर श्रेय की जंग छिड़ गई है। एक शॉपिंग सेंटर का दो बार उद्घाटन किया गया, जिससे विवाद बढ़ गया। धन और राजनीतिक गतिशीलता पर असहमति से प्रशासन पर दबाव है।