वरवंड : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण, सर्व्हिस रोड आणि पुलांच्या कामांदरम्यान ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे वाहनचालकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक दिशादर्शक फलक, इशारे व सुरक्षा उपाययोजना नसल्याने अपघातांचा धोका वाढला असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चौफुला ते वरवंड दरम्यान अन्नपूर्णा हॉटेल शेजारी ओढ्यावर पुलाचे काम सुरू आहे. मात्र, येथे कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक किंवा डायव्हर्जनची सूचना नसल्याने वाहनचालकांना पुढील रस्त्याचा अंदाज येत नाही. याच निष्काळजीपणामुळे एका वाहनचालकाची गाडी थेट सुरू असलेल्या पुलाच्या कामात जाऊन पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी हा प्रकार प्रशासनासाठी गंभीर इशारा मानला जात आहे.
दरम्यान, चौफुला ते वरवंड मार्गावर एचपी पेट्रोल पंप ते अन्नपूर्णा हॉटेल आणि पुढे केडगाव फाटापर्यंत काही ठिकाणी सर्व्हिस रोड पूर्ण झाला असला, तरी अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट अवस्थेत आहे. “रस्ता पुढे बंद आहे” किंवा “डायव्हर्जन पुढे आहे” अशा सूचना नसल्याने वाहनचालक गोंधळून जातात आणि अपघाताची शक्यता वाढते.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात यापूर्वीही किरकोळ अपघात घडले आहेत. तरीही संबंधित ठेकेदार व प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी कामाच्या ठिकाणी तत्काळ दिशादर्शक फलक लावणे, धोकादायक ठिकाणी रिफ्लेक्टर, बॅरिकेड्स व प्रकाशव्यवस्था करणे, तसेच अर्धवट रस्त्यांवर स्पष्ट डायव्हर्जन दर्शविण्याची मागणी केली आहे. निष्काळजीपणाबद्दल संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचीही मागणी जोर धरत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस पावले उचलणे आवश्यक झाले आहे.
“सध्या पुणे-सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ते व पुलांची कामे सुरू आहेत. अशा ठिकाणी दिशादर्शक फलक बसवणे अत्यंत गरजेचे आहे. दोन दिवसांपूर्वी रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात झाला. मोठा अनर्थ टाळण्यासाठी ठेकेदाराने प्रत्येक ठिकाणी योग्य सूचना फलक लावावेत.” - प्रदीप दिवेकर, पंचायत समिती सदस्य, दौंड
Web Summary : Lack of signage on the Pune-Solapur highway during road construction is causing accidents. A recent incident saw a vehicle crash into an unfinished bridge due to missing directions, prompting calls for immediate safety measures and clear diversions to prevent future tragedies.
Web Summary : पुणे-सोलापुर राजमार्ग पर सड़क निर्माण के दौरान साइनेज की कमी से दुर्घटनाएँ हो रही हैं। हाल ही में एक अधूरा पुल में दिशाओं की कमी के कारण एक वाहन दुर्घटनाग्रस्त हो गया, जिससे भविष्य में होने वाली दुर्घटनाओं को रोकने के लिए तत्काल सुरक्षा उपायों और स्पष्ट बदलावों की मांग की गई है।