भीमाशंकर विकासाला चालना; वीज उपकेंद्र व सिंचन योजनांवर मुख्यमंत्र्यांशी वळसे पाटील यांची सकारात्मक चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 17:58 IST2026-04-24T17:57:57+5:302026-04-24T17:58:47+5:30
- कुकडी प्रकल्पांतर्गत तीन नवीन उपसा सिंचन योजनांना मंजुरी मिळाली असून, त्यासाठी पाणी परवानाही उपलब्ध आहे.

भीमाशंकर विकासाला चालना; वीज उपकेंद्र व सिंचन योजनांवर मुख्यमंत्र्यांशी वळसे पाटील यांची सकारात्मक चर्चा
तळेघर : २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिर परिसराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. या अनुषंगाने माजी सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली.
भीमाशंकर परिसरात अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी डिंभे येथे ३३/११ के.व्ही. उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यासाठी जलसंपदा विभागाची ६० आर जमीन महावितरणाला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करून मंजुरी मिळवण्याची मागणी करण्यात आली.
तसेच कुकडी प्रकल्पांतर्गत तीन नवीन उपसा सिंचन योजनांना मंजुरी मिळाली असून, त्यासाठी पाणी परवानाही उपलब्ध आहे. या योजनांची सविस्तर अंदाजपत्रके तयार करून कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबतही चर्चेत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर व आहुपे खोऱ्यातील गावांना डिंभे धरणातील (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर बोरघर-फुलवडे जलउपसा योजनेतून अनुक्रमे ३५८ व २२५ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. तर कळमजाई उपसा सिंचन योजनेंतर्गत ३४७० अश्वशक्तीच्या पंपांच्या साहाय्याने ३९७ मीटर उंचीवर पाणी उचलून सुमारे १००२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा आराखडा आहे. या योजनेचा लाभ गोहे खुर्द, गोहे बुद्रुक, राजेवाडी, पोखरी, चिखली, जांभोरी, नांदुरकीचवाडी, फलोदे, तळेघर, राजपूर, गाडेवाडी, तेरुंगण व निगडाळे अशा १६ गावांना होणार आहे.
दरम्यान, २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथेही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २८८.१७ कोटी रुपयांच्या विस्तृत विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली असून, कामे सुरू आहेत.
यासंदर्भात दिलीप वळसे पाटील म्हणाले, “मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा विकास हे आमचे प्राधान्य आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सर्व विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.”