Pune-Nashik highway: पुणे-नाशिक महामार्गावर महाकोंडी; ५ किमी वाहनांच्या रांगा; प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 12:36 IST2026-05-01T12:35:06+5:302026-05-01T12:36:48+5:30

महामार्गाच्या दोन्ही बाजूंना तब्बल चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवासी तासन्तास अडकून पडले.

pune news massive traffic jam on Pune-Nashik highway; 5 km long queue of vehicles; Passengers plight | Pune-Nashik highway: पुणे-नाशिक महामार्गावर महाकोंडी; ५ किमी वाहनांच्या रांगा; प्रवाशांचे हाल

Pune-Nashik highway: पुणे-नाशिक महामार्गावर महाकोंडी; ५ किमी वाहनांच्या रांगा; प्रवाशांचे हाल

आळेफाटा ( पुणे जि. ) :पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा (ता. संगमनेर) परिसरात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे शुक्रवारी  पहाटेपासून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली. महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीसह सलग आलेल्या विकेंडमुळे पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे निघालेल्या हजारो प्रवाशांना या कोंडीचा मोठा फटका बसला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना तब्बल चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवासी तासन्तास अडकून पडले.

पहाटेपासूनच पुणे, मुंबई आणि परिसरातून नाशिक, शिर्डी तसेच उत्तर महाराष्ट्राकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढू लागली होती. मात्र बोटा परिसरात रस्त्याच्या एका बाजूचे काम सुरू असल्याने वाहतूक एकाच मार्गिकेतून सुरू ठेवण्यात आली. परिणामी सकाळी सहा वाजेपर्यंत महामार्गावर प्रचंड ताण निर्माण झाला आणि वाहतूक अक्षरशः ठप्प झाली.

वाहतूककोंडीत अडकलेल्या अनेक प्रवाशांना एक ते दोन तास एकाच ठिकाणी थांबावे लागले. कडक उन्हामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही वाहनांमधील पिण्याचे पाणी आणि खाद्यपदार्थ संपल्याने प्रवाशांची गैरसोय अधिक वाढली.

मुख्य महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहनचालकांनी म्हसवंडी–पिंपरी पेंढार या अंतर्गत मार्गाचा पर्याय निवडला. मात्र अरुंद ग्रामीण रस्त्यांवर अचानक वाढलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे तेथेही मोठ्या प्रमाणात वाहतूक अडकली. परिणामी बोटा परिसरातील बहुतांश पर्यायी मार्गांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या.

दरम्यान, सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार अपयशी ठरल्याची नाराजी प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. ऐन पर्यटन हंगामात कोणतीही प्रभावी पर्यायी व्यवस्था न केल्याने वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  सध्या संगमनेर आणि घारगाव पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून, वाहनांची संख्या लक्षात घेता कोंडी पूर्णपणे निवळण्यासाठी आणखी काही तास लागू शकतात.

Web Title : पुणे-नासिक राजमार्ग पर जाम: निर्माण के कारण 5 किमी तक कतारें, यात्री फंसे

Web Summary : पुणे-नासिक राजमार्ग पर बोटा के पास निर्माण के चलते भारी जाम लग गया, जिससे 5 किमी तक वाहनों की कतारें लग गईं। छुट्टी के कारण यात्रा कर रहे लोगों को भीड़ और वैकल्पिक मार्गों की कमी के कारण भारी परेशानी हुई। पुलिस जाम हटाने में जुटी है।

Web Title : Pune-Nashik Highway Jam: 5 km Queues, Passengers Stranded Due to Construction

Web Summary : Construction near Bota on the Pune-Nashik highway caused a massive traffic jam, with vehicles backed up for 5 km. Holiday travelers faced severe delays and hardship due to the congestion and lack of alternative routes. Police are working to clear the jam.