धनकवडी : ढोल-ताशा गायब, डीजेचा कब्जा; धनकवडीतील जानुबाई देवीच्या यात्रेतील आत्मा हरवला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 17:13 IST2026-05-03T17:12:30+5:302026-05-03T17:13:07+5:30

- ग्रामदेवतेची यात्रा म्हटलं की ढोल-ताशांचा नाद, लेझीमचे ताल, मर्दानी खेळ आणि भक्तिभावाने भारलेले वातावरण हेच तिचे वैशिष्ट्य

pune news dhol-tasha disappeared, DJ took over; Has the spirit of Janubai Devi's pilgrimage in Dhankawadi been lost? | धनकवडी : ढोल-ताशा गायब, डीजेचा कब्जा; धनकवडीतील जानुबाई देवीच्या यात्रेतील आत्मा हरवला?

धनकवडी : ढोल-ताशा गायब, डीजेचा कब्जा; धनकवडीतील जानुबाई देवीच्या यात्रेतील आत्मा हरवला?

पुणे/धनकवडी  - पुण्याच्या धनकवडीतील ग्रामदेवतेच्या यात्रेत यंदा पुन्हा एकदा परंपरा आणि आधुनिकतेचा संघर्ष ठळकपणे समोर आला. श्रद्धा, एकोपा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानली जाणारी यात्रा डीजेच्या कर्णकर्कश आवाजात हरवताना दिसत आहे.

ग्रामदेवतेची यात्रा म्हटलं की ढोल-ताशांचा नाद, लेझीमचे ताल, मर्दानी खेळ आणि भक्तिभावाने भारलेले वातावरण हेच तिचे वैशिष्ट्य. मात्र बदलत्या काळात या पारंपरिक वाद्यांची जागा मोठमोठ्या साऊंड सिस्टीम आणि डीजेने घेतली आहे.

धनकवडीत जानुबाई माता देवीची यात्रा शुक्रवारी पार पडली, पण त्यानंतरच्या दिवशी परिसरात उभारलेल्या डीजेच्या भिंतींनी संपूर्ण वातावरण दणाणून सोडले. अवघ्या अर्ध्या किलोमीटरच्या परिसरात आठ ते नऊ ठिकाणी उभारलेल्या डीजे सिस्टीममुळे कानठळ्या बसवणारा आवाज निर्माण झाला होता. या गोंगाटामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले असून, रस्ते आणि वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली. ध्वनी मर्यादा धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे.

गणेशोत्सव, दहीहंडीप्रमाणेच यात्रेतही डीजे संस्कृतीने जोर धरला आहे. यामुळे डीजेला सुगीचे दिवस आले असले तरी  पारंपरिक वाद्ये, लोककला आणि सांस्कृतिक वारसा दुय्यम ठरत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या डीजेवर लाखो रुपयांचा खर्च होत असून, त्याचा आर्थिक बोजा अप्रत्यक्षपणे गावकऱ्यांवरच पडत आहे.

चार वर्षांपूर्वी यात्रेदरम्यान साऊंड सिस्टीम वाहून नेणाऱ्या वाहनाचा अपघात होऊन एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर गावकऱ्यांनी डीजेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कालांतराने तो निर्णय केवळ कागदावरच राहिला, आणि पुन्हा एकदा डीजेचा दणदणाट वाढू लागला.

ग्रामदेवतेच्या यात्रेचा आत्मा जपायचा की डीजेच्या गोंगाटात तो हरवू द्यायचा, हा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय.. झाला आहे. परंपरा टिकवण्यासाठी आणि ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांनी एकत्रितपणे ठोस भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title : धनकवडी यात्रा: डीजे का कब्जा, पारंपरिक भावनाएं गुम?

Web Summary : धनकवडी की जानुबाई देवी यात्रा में डीजे ने ढोल-ताशा की जगह ले ली, जिससे परंपरा और आधुनिकता का टकराव हो रहा है। ध्वनि प्रदूषण और यातायात बाधित होने से निवासी परेशान हैं। सांस्कृतिक विरासत को संरक्षित करने और विनियमन की आवश्यकता है, अतीत में साउंड सिस्टम से संबंधित दुर्घटना हुई थी।

Web Title : Dhanakwadi Yatra: DJ Takes Over, Traditional Spirit Lost?

Web Summary : Dhanakwadi's Janubai Devi Yatra faces a clash between tradition and modernity as loud DJs replace traditional Dhol-Tasha. Residents are troubled by noise pollution and disrupted traffic. A past accident related to sound systems highlights the need for regulation and preservation of cultural heritage.