कलेक्टर म्हणतात,पुण्याची दिल्ली होऊ देणार नाही, आरएमसी प्लांट मालक म्हणतात,पुणे सोडणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 11:35 IST2026-05-10T11:34:57+5:302026-05-10T11:35:11+5:30

आरएमसी प्रकल्प हा केवळ व्यवसाय नाही, तर ती सध्याची गरज आहे. सहा महिने प्रकल्प बंद ठेवले, तर याचा परिणाम शहराच्या विकासावर आणि प्रकल्पावर होणार

pune news collector says, won't let Pune become Delhi, RMC plant owner says, won't leave Pune | कलेक्टर म्हणतात,पुण्याची दिल्ली होऊ देणार नाही, आरएमसी प्लांट मालक म्हणतात,पुणे सोडणार नाही...

कलेक्टर म्हणतात,पुण्याची दिल्ली होऊ देणार नाही, आरएमसी प्लांट मालक म्हणतात,पुणे सोडणार नाही...

हिरा सरवदे
 
पुणे : शहराच्या प्रदूषणात आणि धूलिकण वाढविण्यात रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पाचा मोठा वाटा आहे. या प्रकल्पांमुळे हवा खराब होऊन त्यात वाढ होत असल्याचे अभ्यासाअंती समोर आल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुण्याची दिल्ली होऊ देणार नाही, असे स्पष्ट बजावले आहे. त्यामुळेच सहा महिन्यांत सर्व प्रकल्प शहराबाहेर हलवण्याचा निर्धार त्यांनी केला. दुसरीकडे आरएमसी प्रकल्प मालकांनी, आम्ही पुणे सोडणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे हा प्रश्न कसा निकाली निघणार आणि नागरिकांना कधी दिलासा मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे आरएमसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर काय म्हणतात...

आरएमसी प्रकल्प हा केवळ व्यवसाय नाही, तर ती सध्याची गरज आहे. सहा महिने प्रकल्प बंद ठेवले, तर याचा परिणाम शहराच्या विकासावर आणि प्रकल्पावर होणार आहे. प्रकल्प शहराबाहेर हलवण्याची मागणी केली जात आहे. शासनाने सर्व प्रकल्पांना जागा उपलब्ध करून दिली तर जाण्याची आमची तयारी आहे. मात्र, काँक्रीटचे लाइफ दोन तासांचे आहे. त्यापेक्षा जास्त काळ प्रवासात गेला तर त्याच्या दर्जावर व कामावर होणार आहे, याचा विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे आमची प्रशासनाकडे मागणी आहे की, यासंदर्भात एक नियमावली तयार करावी आणि आहे त्याच जागेवर प्रकल्पांचे नियमितीकरण करून द्यावे, आम्ही सर्व नियम पाळण्यास तयार आहोत. जे प्रकल्प नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी काय म्हणतात...

आरएमसी प्रकल्पांमुळे प्रदूषणात वाढ होते, ते विविध अभ्यासांतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे प्रकल्प शहराबाहेर हलवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत नियमावली (धोरण) तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तोपर्यंत प्रकल्पांवर कारवाई केली जाणार नाही. रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी प्रकल्पांच्या डंपर व मिक्सर चालकांनी लेनची शिस्त पाळणे गरजेचे आहे. प्रकल्पांच्या अनधिकृत बांधकामांना महापालिकेने पारवानगी द्यावी, अशी असोसिएशनची मागणी होती, त्यानुसार महापालिकेकडून तात्पुरती परवानगी दिली जाणार आहे. मात्र, विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आरएमसी प्रकल्पांना शहराबाहेर जावेच लागेल.

पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यात जवळपास तीनशे ते सव्वातीनशे आरएमसी प्रकल्प आहेत. यामध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीत शंभर ते सव्वासे प्रकल्प आहेत. यातील एकाही प्रकल्पाने बांधकामासाठी पुणे महापालिकेची परवानगी घेतलेली नाही. आता प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारणे सुरू केल्यानंतर महापालिकेकडून परवानगी घेण्याच्या हालचाली प्रकल्प मालकांनी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

- २१ दिवसांत धोरण तयार होणार

पुणे आरएमसी असोसिएशनने प्रकल्प बंद करण्याचे धोरण अवलंबून प्रशासनाला नमवायचे धोरण आखले होते. मात्र, आपलेच नुकसान होत आहे, हे लक्षात आल्यानंतर प्रशासनासोबत बैठका घेण्याचे प्रयत्न झाले. असोसिएशनचे पदाधिकारी आणि प्रशासनाच्या बैठकीत एक धोरण (नियमावली) तयार करण्याची चर्चा झाली. त्या चर्चेनुसार प्रशासनाकडून २१ दिवसांत धोरण तयार करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

शहराबाहेर हलवणार; पण शासकीय जमीन देणार नाही...

सध्या शहर व जिल्ह्यात असलेले आरएमसी प्रकल्प हे खासगी जागेत आहेत. कोणत्याही प्रकल्पाला शासकीय जागा देण्यात आलेली नाही. प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विचार करता, हे प्रकल्प शहराबाहेर हलवणे पर्यावरण संतुलनासाठी गरजेचे आहे. ते सहा महिन्यांत केले जाणार आहे. हे करीत असताना एकाही प्रकल्पाला शासकीय जमीन दिली जाणार नाही, त्यांची त्यांनी जमीन शोधायची आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे.

- आरएमसी प्रकल्प बंद झाल्यानंतर २५ दिवसांत डंपरमुळे अपघात नाही...

शहरात होणारे बहुसंख्य अपघात हे काँक्रीट मिक्सर आणि डंपरमुळे होतात. यामध्ये निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागतो. आरएमसी प्रकल्प मालकांनी प्रकल्प बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर मिक्सर आणि डंपर येत नाही. त्यामुळे गेल्या २५ दिवसांत डंपर किंवा मिक्सरमुळे शहरात कोठेही अपघात घडला नसल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- वीटभट्ट्या शहराबाहेर गेल्या तसे प्रकल्पही जातील...

पूर्वी शहरात विविध ठिकाणी वीटभट्ट्या होत्या. वीटभट्ट्यांची संख्या वाढल्यानंतर त्यामुळे होणारे प्रदूषणही वाढले. त्यामुळे शहरातील सर्व वीटभट्ट्या शहराबाहेर गेल्या. तशाच प्रकारे सध्या शहरातील आरएमसी प्रकल्पांची संख्या वाढल्याने त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणातही वाढ झाली आहे. या प्रदूषणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीटभट्ट्यांप्रमाणेच आरएमसी प्रकल्पही शहराच्या बाहेर जाणे गरजेचे आहे, असे मत वडगाव खुर्द येथील एका त्रस्त नागरिकाने व्यक्त केले आहे.

- आरएमसी प्रकल्प शहराच्या प्रदूषणास कारणीभूत...

आरएमसी प्रकल्पामुळे प्रदूषण होत नाही, असा जावईशोध प्रकल्प मालकांनी लावलेला आहे. प्रत्यक्षात प्रकल्पांच्या परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आणि फुप्फुसाचे आजार जडत असल्याचे समोर आले आहे. शिवाय विविध अभ्यासांमधून आरएमसी प्रकल्पामुळे प्रदूषणात वाढ होते, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आरएमसी प्रकल्प हेच शहराच्या प्रदूषणास कारणीभूत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.
----------------------

Web Title : प्रदूषण के कारण पुणे आरएमसी संयंत्रों पर स्थानांतरण का खतरा, विरोध जारी।

Web Summary : पुणे के कलेक्टर आरएमसी संयंत्रों को प्रदूषण कम करने के लिए स्थानांतरित करने पर जोर दे रहे हैं, दिल्ली जैसी स्थिति को रोकने का लक्ष्य है। संयंत्र मालिक विकास पर प्रभाव और कंक्रीट के कम जीवनकाल का हवाला देते हुए विरोध कर रहे हैं। नीति का मसौदा तैयार किया जा रहा है, लेकिन स्थानांतरण की समय सीमा तय है।

Web Title : Pune RMC Plants Face Relocation Amid Pollution Concerns and Resistance.

Web Summary : Pune's Collector insists RMC plants must move to curb pollution, aiming to prevent a Delhi-like situation. Plant owners resist, citing developmental impact and concrete's short lifespan. A policy is being drafted, but the relocation deadline remains firm.