कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
By मुरलीधर भवार | Updated: May 11, 2026 11:11 IST2026-05-11T11:09:12+5:302026-05-11T11:11:12+5:30
Kalyan Latest News: कल्याण-डोंबिवलीतील मध्यरात्रीच्या परिस्थितीचा लोकमत प्रतिनिधींनी घेतलेला हा 'ऑन द स्पॉट' आढावा....

कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
-मुरलीधर भवार, कल्याण
रात्रीचे १२ वाजलेले... कल्याण स्टेशनच्या बाहेर पश्चिमेत गजबज थोडी कमी झालेली... स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर शरीरविक्रय करणाऱ्या महिला उभ्या आहेत... स्टेशनबाहेरील पान टपऱ्या आणि चहाची दुकाने उघडी आहेत. मध्यरात्री तीन वाजेपर्यंत येथील वर्दळ पाहून कल्याण स्टेशन आहे की रेडलाइट एरिया?, असा प्रश्न पडतो.
शरीरविक्रय करणाऱ्या महिला दिवस-रात्र स्कायवॉकवर उभ्या असल्याने सर्वसामान्य, तसेच महिलांना येथून जाणे मुश्किल होते. कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेंना येथे थांबा आहे. त्यामुळे प्रवाशांची दिवस-रात्र वर्दळ असते.
या स्कायवॉकवर शरीर विक्रय करणाऱ्या महिला उभ्या असतात. अनेक यू ट्यूबवर त्याचे व्हिडीओ दिसतात. यूट्यूब व्हिडीओ करणाऱ्यांना या महिलांनी मारहाण केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. स्कायवॉकला लागून निलम गल्ली आहे. तेथे गेस्ट हाऊस आणि लॉजिंग-बोर्डिंग आहेत. येथे देह विक्रीचा व्यवसाय चालतो. निलम गल्लीतच लॉटरी सेंटर आणि जुगार चालतो.
कल्याण स्टेशन परिसर रेड लाइट एरिया घोषित करा, अशी मागणी मनसेने महापालिकेकडे केली होती. पोलिसांकडून अनेक वेळा कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.
रात्रभर खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू
स्टेशन परिसरात रात्रभर खाद्यपदार्थ आणि चहाचे स्टॉल सुरू असतात. येथे नशोखोरांचा वावर असतो. ते दिवसा महात्मा फुले पुतळ्याजवळ ठिय्या देऊन असतात. तर रात्री रेल्वे स्थानक परिसरात फिरतात.
महापालिकेच्या नियमानुसार दुकाने रात्री १० ते ११ पर्यंत बंद करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक पान टपऱ्या, चहाची दुकाने रात्री २ वाजेपर्यंत उघडी असतात. पान टपऱ्यांवर गुटखा सर्रासपणे विकला जातो.
रात्री ११ वाजल्यानंतर पोलिस गाडी फिरते. काहींकडून ५ हजार दंड आकारला जातो. मात्र, पुन्हा आहे तसे सुरू होते.
हा तर 'बार रोड'?
कल्याण-भिवंडी बायपास रस्ता आणि कल्याण- शीळ रस्त्यावर लेडीज आणि ऑर्केस्ट्रा बार आहे. त्यामुळे कल्याण शीळ रस्त्याला उपरोधिकपणे बार रोड, असे संबोध जाते. हे बारदेखील रात्री २ ते ३ वाजेपर्यंत सुरू असतात. अनेक बारला जोडून लॉजिंग बोर्डिंग आहेत पोलिस आणि महसूल प्रशासनापर्यं त्यातील हिस्सा पोहोचविला जातो.
ढाबे रात्री २ वाजेपर्यंत
महापालिका हद्दीतील ढाबेदेखील रात्री १ ते २ वाजेपर्यंत सुरू असतात त्यांना वेळेचे बंधन नाही. काही ढाब्यांवर मद्यपानाची परवानगी नसताना त्याठिकाणी सर्रासपणे मद्यपान केले जाते.