‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’ विजय वडेट्टीवार यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:04 IST2026-05-11T11:13:39+5:302026-05-11T12:04:46+5:30
Vijay Wadettiwar Criticize Narendra Modi: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. साहेब, देशाला बर्बाद करायचं कार्यक्रम तुम्ही करायचा आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची?असा सवाल वडेट्टीवार यांनी मोदींना विचारला आहे.

‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’ विजय वडेट्टीवार यांचा टोला
आखाती देशांमध्ये कायम असलेली तणावपूर्ण परिस्थिती, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे विस्कळीत होत असलेला खनिज तेलाचा पुरवठा, डॉलरच्या तुलनेत घसरत असलेलं रुपयाचं मूल्य या पार्श्वभूमीवर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल आणि डिझेलचा जपून वापर करण्याचं तसेच वर्षभर सोन्याची खरेदी न करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र या आवाहनानंतर विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर चौफेर टीका होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. साहेब, देशाला बर्बाद करायचं कार्यक्रम तुम्ही करायचा आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची?असा सवाल वडेट्टीवार यांनी मोदींना विचारला आहे.
या संदर्भात सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये विजय वडेट्टीवार यांनी लिहिले की, २००८ च्या महाभयंकर जागतिक मंदीतही ज्या देशाचं सुकाणू हललं नाही. मंदीचे चटके बसत असतानाही आपला देश सुरक्षित राहिला. तिथे आज महासत्तेच्या नावाखाली जनतेलाच त्याग करायला सांगितलं जातंय! २०१४ मध्ये अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज सांगतात पेट्रोल, डिझेल वापरू नका, सोनं घेऊ नका, खाद्यतेल कमी करा! साहेब, देशाला बर्बाद करायचं कार्यक्रम तुम्ही करायचा आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची? अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
२००८ च्या महाभयंकर जागतिक मंदीतही ज्या देशाचं सुकाणू हललं नाही,मंदीचे चटके बसत असतानाही आपला देश सुरक्षित राहिला.. तिथे आज महासत्तेच्या नावाखाली जनतेलाच त्याग करायला सांगितलं जातंय! २०१४ मध्ये अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज सांगतात पेट्रोल, डिझेल वापरू नका, सोनं घेऊ… pic.twitter.com/eM0FBA2vgC
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) May 11, 2026
यावेळी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका होईपर्यंत या मुद्द्यावर भाष्य न करण्यावरूनही वडेट्टीवार यांनी मोदींवर निशाणा साधला. पाच राज्याच्या निवडणुका होईपर्यंत युद्धाचा विसर पडला होता, आता निवडणुका संपल्या की लगेच 'त्याग' आठवला? सल्ले द्यायला फक्त पंतप्रधान, आणि भोगायला मात्र सामान्य जनता! वाह मोदीजी वाह!, असा टोला त्यांनी लगावला.