Pune MHADA : ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर म्हाडाच्या २९५ सदनिका विक्रीला; संकेतस्थळावर करता येणार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 13:10 IST2026-04-24T13:09:53+5:302026-04-24T13:10:14+5:30
‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर म्हाडाच्या २९५ सदनिका विक्रीला, संकेतस्थळावर करता येणार अर्ज

Pune MHADA : ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर म्हाडाच्या २९५ सदनिका विक्रीला; संकेतस्थळावर करता येणार अर्ज
पुणे :पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर सर्वसाधारण प्रवर्गातील गरजू व पात्र नागरिकांसाठी २९५ सदनिकांचे ऑनलाइन पद्धतीने वितरण करण्यासाठी जाहिरात काढली आहे. ही घरे १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील आहेत, अशी माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिली.
म्हाडाने यापूर्वी काढलेल्या या दोन्ही योजनांतील सोडतीनंतर मागणीअभावी रिक्त राहिलेल्या सदनिका विक्रीसाठी काढल्या आहेत. विकासकाकडून प्राप्त अहवालानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर वाटप करण्याचे नियोजित आहे. या विक्रीमध्ये पारदर्शकता ठेवण्याच्या हेतूने सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू व पात्र अर्जदारांना सदनिका वितरित करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने म्हाडा संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.
तसेच विकासकांकडून सोडतीनंतर विक्रीअभावी शिल्लक सदनिका जसजशा उपलब्ध होतील तसतशा पडताळणीअंती ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू व पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.