पुणे (लोहगाव) : विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्ज विक्री करण्यासाठी आलेल्या दोन सराईतांना पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्याकडून एकूण २६,७१,८००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ०८/०४/२०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस शिपाई हरी पुंडे आणि लालु कऱ्हे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जनक बाबा दर्गा चौकाजवळ, खराडी बायपासकडून फॉरेस्ट पार्ककडे जाणाऱ्या रोडवर एक व्यक्ती ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. पोलिसांनी प्रितम प्रफुल्ल कुलकर्णी (वय ३७, रा. वडगावशेरी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३.५९ ग्रॅम एम.डी. पावडर आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. आरोपी प्रितम कुलकर्णीच्या पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या चौकशीतून उबेद अन्सार खान (वय २७, रा. हडपसर) याचे नाव समोर आले. तो खुळेवाडी परिसरात ड्रग्ज विक्रीसाठी आला असताना पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ ग्रॅम एम.डी. पावडर आणि एक स्कार्पिओ कार जप्त करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एम.डी. ड्रग्जसह वाहने असा एकूण २६,७१,८००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड करत आहेत.