Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 08:46 IST

Mumbai BKC Traffic Update: वांद्रे कुर्ला संकुलात मेट्रोच्या कामादरम्यान क्रेन उलटल्याने मोठा अपघात झाला.

BKC Crane Accident: मुंबईची आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात बुधवारी सकाळी मेट्रो कामादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. मेट्रोचा खांब उभारण्याचे काम सुरू असताना बीम उचलणारी क्रेन अचानक उलटली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र काही कामगार किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.

बुधवारी सकाळी १५ एप्रिल रोजी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या कामादरम्यान ही घटना घडली. मेट्रो पुलाच्या खांबावर जड बीम बसवण्याचे काम सुरू असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. भल्यामोठ्या क्रेनने तोल गमावल्याने क्रेनसह तो अजस्त्र बीम खाली कोसळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

मदतकार्य आणि प्रशासनाची भूमिका

घटनेची माहिती मिळताच एमएमआरडीए आणि एमएमआरसीच्या आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी तात्काळ अवजड मशिनरी बोलावण्यात आली असून कोसळलेली क्रेन आणि बीम हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा अपघात क्रेनमधील यांत्रिक बिघाडामुळे झाला की सुरक्षा नियमांच्या दुर्लक्षामुळे, याचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे.

 BKC परिसरात वाहतुकीचा खोळंबा

या अपघातामुळे कुर्ला आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेकडे जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आयसीआयसीआय बँक बेस्ट बस स्टॉप सिग्नलजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे कुर्ल्याकडे जाणारी वाहतूक डायमंड मार्केटच्या आतील भागातून वळवण्यात आली आहे.

कुर्ल्याकडे जाण्यासाठी: वाहने डायमंड मार्केट गेट क्रमांक ८ कडे वळवण्यात आली असून, धीरूभाई अंबानी स्क्वेअरवरून यू-टर्न घेता येईल.

वेस्टर्न एक्सप्रेस हायवे / भारत नगरकडे जाण्यासाठी: कुर्ल्याकडून येणारी वाहने डायमंड मार्केट सिग्नलवरून डावे वळण घेऊन आतल्या बाजूने बाहेर पडता येणार आहे.

तपास आणि बीम हटवण्याचे काम सुरू असेपर्यंत नागरिकांनी शक्य असल्यास या मार्गाचा वापर टाळावा आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Crane Collapse at BKC Metro Site Disrupts Traffic; No Fatalities

Web Summary : A crane collapsed during metro construction in BKC, Mumbai, causing traffic disruptions on Kurla-Western Express Highway. While no fatalities occurred, a few workers sustained minor injuries. Authorities are investigating the incident and working to clear the area.
टॅग्स :मुंबईअपघातमुंबई पोलीसमेट्रोवाहतूक कोंडी