तू फक्त माझीच..नाहीतर कोणाचीच नाही; पुण्यात तरुणीवर जीवघेणा हल्ला करून प्रियकर पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 14:41 IST2026-05-03T14:38:29+5:302026-05-03T14:41:52+5:30
Pune Crime : पोलिसांनी तिला विचारणा केली. तेव्हा तरुणीने पेन आणि कागद देण्यास सांगितले. कागदावर तिने आरोपीचे नाव लिहिले.

तू फक्त माझीच..नाहीतर कोणाचीच नाही; पुण्यात तरुणीवर जीवघेणा हल्ला करून प्रियकर पसार
पुणे : प्रेम प्रकरणात झालेल्या वादातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरल्याची धक्कादायक घटना चंदननगर भागात घडली. तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. तरुणीवर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय २२, सध्या रा. चंदननगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे.
या प्रकरणी दिलीप राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उजालादेवीचा मोठा भाऊ भगतसिंग (वय २५) याने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने केलेल्या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. सुरुवातीला तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश बडाख यांनी दिली.
आरोपी तरुण आणि उजालादेवी हे नगर रस्त्यावरील एका माॅलमध्ये काम करत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू झाली. उजालादेवी ही चंदननगरमघील पठारे वस्ती भागात राहायला आहे. बुधवारी (दि. २९) आरोपी पठारे वस्ती भागात आला. तरुणी एकटीत घरात होती. तरुणीचा भाऊ भगतसिंग आणि त्याची पत्नी कामावर गेले होते. आरोपी उजालादेवीच्या घरात शिरला. त्याने तिच्याशी वाद घालून ब्लेडने गळा चिरला.
आरोपीने केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत तिने भाऊ भगतसिंग याच्या मोबाईलवर संपर्क साधला. ‘तू लवकर घरी ये. मला एकाने मारले आहे’, असे तिने भावाला सांगितले. त्यानंतर भावाने तेथे धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तरुणीचा गळा चिरण्यात आल्याने तिला बोलता येत नव्हते. पोलिसांनी तिला विचारणा केली. तेव्हा तरुणीने पेन आणि कागद देण्यास सांगितले. कागदावर तिने आरोपीचे नाव लिहिले. या घटनेनंतर चंदननगरमधील पठारे वस्ती घबराट उडाली. पसार झालेल्या आरोपीचा शोघ घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे, असे पोलिस निरीक्षक बडाख यांनी सांगितले.