IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण

Rohit Sharma Mumbai Indians IPL 2026: गेल्या ५ सामन्यापासून रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर, त्यातच या पोस्टमुळे खळबळ

मुंबई इंडियन्सला पाच वेळा चॅम्पियन बनवणारा कर्णधार रोहित शर्मा सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. यंदाच्या हंगामात चांगली सुरुवात केल्यानंतर दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले आहे.

रोहित शर्मा शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध खेळताना दिसला होता. फलंदाजी करताना त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आणि तेव्हापासून तो मुंबई इंडियन्सचे पाच सामने खेळू शकलेला नाही.

मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये काहीतरी बिनसल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत. तशातच आता एका व्हायरल पोस्टमुळे रोहित शर्माच्या क्रिकेटमधील भवितव्याबाबतच्या चर्चांना भलतेच उधाण आले आहे.

व्हायरल पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन पुढच्या हंगामापूर्वी रोहितला संघातून करारमुक्त करू शकते, कारण त्यांना रोहित शर्मा आता संघात खेळवायचे नाहीये.

व्हायरल पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, रोहित शर्मा सध्याही पूर्णपणे तंदुरुस्त आहे, पण संघ व्यवस्थापन त्याला खेळवत नाहीये. इतकेच नव्हे तर MI रोहितला रिलीज करण्यासही तयार आहे.

रोहितला रिलीज केल्यास तो इतर टीममध्ये जाईल असे वाटत नाही. कारण त्याला MI व्यतिरिक्त कुणासोबतही खेळायचे नाही. त्यामुळे तो थेट IPL निवृत्ती घेईल, असेही व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे.

पण याबाबत सविस्तर माहिती घेतली असता असे लक्षात आले की, या व्हायरल पोस्टमध्ये केलेले सर्व दावे खोटे आहेत. कारण मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी रोहितबाबत माहिती दिली आहे.

रोहित दुखापतीतून लवकर बरा होत आहे, परंतु वैद्यकीय टीमने अद्याप रोहितला खेळण्याची परवानगी दिलेली नाही. एकदा ती मिळाल्यानंतर त्याचे मैदानावर पुनरागमन शक्य आहे, असेही जयवर्धने म्हणाला आहे.

मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या खराब कामगिरीनंतर रोहित शर्माला पुन्हा एकदा संघाचा कर्णधार करा, अशी मागणी चाहते करताना दिसत आहेत. ती मागणी पूर्ण होणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.