Pune Crime : महिलांची सुरक्षा कुठे ? पुण्यात भररस्त्यात तरुणीची छेडछाड; नागरिकांनी दिला बेदम चोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:30 IST2026-05-07T13:29:30+5:302026-05-07T13:30:25+5:30
Pune Crime - वारजे पोलिसांची दुहेरी कारवाई; विनयभंगासह मारहाण करणाऱ्या ५ ते ६ जणांवरही गुन्हा

Pune Crime : महिलांची सुरक्षा कुठे ? पुण्यात भररस्त्यात तरुणीची छेडछाड; नागरिकांनी दिला बेदम चोप
शगुफ्ता शेख
पुणे - शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना राजाराम पूल परिसरात घडली आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास एका मद्यधुंद तरुणाने भररस्त्यात तरुणीची छेडछाड केल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला. संतप्त नागरिकांनी संबंधित तरुणाला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेनंतर वारजे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, कायदा हातात घेतल्याप्रकरणी नागरिकांवरही गुन्हे नोंदवण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. राजाराम पूल परिसरातील वर्दळीच्या रस्त्यावरून एक तरुणी जात असताना मद्याच्या नशेत असलेल्या तरुणाने तिला अडवून अश्लील शब्दांत बोलण्यास सुरुवात केली. तरुणीने विरोध करून तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिचा पाठलाग करत तिला सतत त्रास दिला.
भररस्त्यात सुरू असलेला हा प्रकार पाहून परिसरातील नागरिक आणि प्रवासी संतप्त झाले. काही नागरिकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. अखेर जमावाने त्याला घेरत बेदम मारहाण केली. घटनेदरम्यान परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
माहिती मिळताच वारजे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवत ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत आरोपीने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाला वेगळे वळण तेव्हा मिळाले जेव्हा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या नागरिकांविरुद्धही गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, “महिलेची छेडछाड करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी कायदा हातात घेणे योग्य नाही. मारहाण झालेल्या तरुणाच्या तक्रारीनुसार पाच ते सहा अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.”
या घटनेमुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. वारजे पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून पुढील तपास सुरू आहे. तसेच अशा घटना घडल्यास नागरिकांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.