Pune crime : मुलगी परत द्या..! म्हणत रस्त्यातच उचललं; वडिलांसह नातेवाईकांनीच केलं अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 19:00 IST2026-05-07T18:59:42+5:302026-05-07T19:00:48+5:30
Pune crime : विवाहितेचे वडिलांकडून अपहरण; ४ तासांत ७ आरोपी जेरबंद;जबरदस्तीने दुसरे लग्न लावण्याच्या उद्देशाने धक्कादायक प्रकार

Pune crime : मुलगी परत द्या..! म्हणत रस्त्यातच उचललं; वडिलांसह नातेवाईकांनीच केलं अपहरण
निरगुडसर (पुणे जि.) : आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, विवाहित मुलीचे तिच्याच वडिलांनी साथीदारांच्या मदतीने अपहरण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पारगाव कारखाना पोलिसांनी तातडीने कारवाई करीत अवघ्या चार तासांत सात आरोपींना अटक करून उल्लेखनीय कामगिरी बजावली.
ही घटना ४ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास घडली. साक्षी विशाल भागवत (रा. पारगाव, लबडे मळा, ता. आंबेगाव, जि. पुणे) या त्यांच्या सासरच्या व्यक्तीसोबत असताना, त्यांच्या वडिलांसह अन्य सहा जणांनी त्यांना अडवले. आरोपींनी मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करीत जबरदस्तीने वाहनात टाकून त्यांचे अपहरण केले. प्राथमिक तपासात या अपहरणामागील उद्देश पीडितेचे जबरदस्तीने दुसरे लग्न लावून देण्याचा असल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तात्काळ हालचाल सुरू केली. विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत पोलिसांनी अवघ्या चार तासांत सर्व आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. याप्रकरणी शिवाजी भाऊ खाटेकर (वय ४५, रा. पारगाव, ता. आंबेगाव), अमोल चांगदेव रोडे (वय ३३), सचिन रावसाहेब रोडे (वय २९), अक्षय विश्वनाथ वाडगे (वय २९), अभिजीत बारकू रोडे (वय २६), नंदकिशोर विलास तितर (वय ३२, सर्व रा. नांदूर खंदरमाळ, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) तसेच जयश्री अशोक कुदनर (वय ३५, रा. साकोर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे, पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस हवालदार अविनाश कालेकर, सचिन डामसे तसेच पोलिस कर्मचारी संजय साळवे, मंगेश अंभग, चंद्रकांत गव्हाणे, प्रशांत जगताप आणि महिला पोलिस अंमलदार काजल फलके यांचा सहभाग होता.