Pune Crime: नसरापूर बालिकेच्या हत्येतील आरोपीचा काळा इतिहास उघड; महिलांच्या छळाचे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 14:44 IST2026-05-02T14:37:11+5:302026-05-02T14:44:41+5:30
Pune crime : परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजच्या आधारे ग्रामस्थांनी आरोपीचा माग काढत त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

Pune Crime: नसरापूर बालिकेच्या हत्येतील आरोपीचा काळा इतिहास उघड; महिलांच्या छळाचे आरोप
नसरापूर (पुणे जि.) : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तपासादरम्यान बालिकेच्या हत्येतील आरोपीवर पूर्वीपासूनच महिलांच्या छळाचे आरोप एका प्रकरणात त्याने शिक्षा भोगल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी पुणे–सातारा महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
अधिकच्या माहितीनुसार, भिमराव कांबळे (वय ६०, रा. साळवडे, ता. भोर) याने “वासरू दाखवतो” असे सांगून चिमुकलीला गुरांच्या गोठ्याकडे नेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बालिका निरागसपणे आरोपीसोबत जाताना दिसत आहे. त्यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केली आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवल्याचे तपासात उघड झाले. सदर बालिका सुट्टीसाठी आजोळी आली होती. बराच वेळ ती दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजच्या आधारे ग्रामस्थांनी आरोपीचा माग काढत त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा आणि तपास प्रक्रिया सुरू ठेवली. मात्र, ग्रामस्थांना योग्य माहिती न दिल्याचा आरोप करत नागरिक आक्रमक झाले. हजारो ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत बाजारपेठ बंद ठेवली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी पुणे–सातारा महामार्गावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तपासादरम्यान बालिकेच्या हत्येतील आरोपीवर पूर्वीपासूनच महिलांच्या छळाचे आरोप एका प्रकरणात त्याने शिक्षा भोगल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. “हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. १५ दिवसांत आरोपपत्र दाखल करून कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. या घटनेमुळे नसरापूरसह संपूर्ण पुणे जिल्हा हादरला असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.