पुणे : वडगाव शेरी परिसरात जमिनीच्या वादातून मोठा थरार पाहायला मिळाला. सुमारे ३० ते ४० जणांच्या टोळीने एका खासगी प्लॉटमध्ये शिरकाव करून तो बळकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड, राज ढाकलिया, रुपेश ढाकलिया, बिडकर, लुंकड यांचा मॅनेजर आणि त्यांच्या अन्य ३० ते ४० साथीदारांविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रवींद्र हिरालाल दुगड (वय ५८, रा. पुष्पा हाईट्स, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
यावेळी आरोपींनी प्लॉटमध्ये ट्रॅक्टर, डंपरसह कम्पाऊंडचे गेट तोडून सुरक्षा रक्षकाला मारहाण करून जबरदस्तीने प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हा प्रकार वडगाव शेरी येथील सर्व्हे नंबर ३० मध्ये गुरुवारी (दि. ७) सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास घडला. दरम्यान, यापूर्वीही अमित लुंकड याच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेत अनेकांनी तक्रारी दिलेल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र दुगड यांचा दुगड इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी नावाने कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्यांनी वडगाव शेरी येथील सर्व्हे नंबर ३० मधील ४० गुंठे जागा गलांडे व इतर ७ जणांनी तालेरा यांच्याकडून सामाईकपणे घेतली होती. १९९५ ते २००२ या कालावधीत त्यापैकी सुमित राठोड यांनी ३४.५ गुंठे जागा खरेदी केली होती. उर्वरित जागा लुंकड यांनी खरेदी केली होती.
२०२३ मध्ये सुमित राठोड यांच्याकडून ३१ गुंठे जागा दुगड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या नावावर, तर ३.५ गुंठे जागा तेजस प्रवीण दुगड यांच्या नावाने खरेदीखताद्वारे खरेदी करण्यात आली होती. दुगड यांनी जागा खरेदी केल्यानंतर त्या जागेच्या ७/१२ उताऱ्यावर त्यांचे नाव लागले आहे. तसेच, जागा खरेदी करताना या जागेवरील सुमित राठोड यांच्या ७ प्लॉटचे प्रॉपर्टी टॅक्सही दुगड यांच्या नावावर करण्यात आले आहेत.
तसेच, सुमित राठोड यांच्या नावाचे दोन लाईट मीटर व वॉटर मीटर होते. ते फिर्यादी यांच्या नावावर करून घेण्यात आले होते. या जागेवरील बांधकामासाठी संरक्षण मंत्रालयाकडून एमओडीची एनओसी घेण्यात आली. तसेच फायर विभागाची प्रोव्हिजनल एनओसीही घेण्यात आली. पुणे महापालिकेकडे जवळपास ५ कोटी रुपयांचे चलन भरलेले आहे. गौण खनिजाची परवानगी घेऊन रॉयल्टीचे पैसेही भरले आहेत. त्यानंतर या जागेवर कंट्रोल ब्लास्टिंगची परवानगी घेण्यात आली आहे.
जागेवरील बांधकामासाठी सर्व परवानग्या घेऊन दोन महिन्यांपासून काम सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी सध्या काम सुरू असून, या कामाच्या पाहणीसाठी दोन सुपरवायझर, दोन वॉचमन आणि एक सिनिअर इंजिनिअर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय घडली...
७ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिर्यादी यांचा मुलगा ऋषभ दुगड यांना सुपरवायझर विशाल पवार याने फोन करून कळवले की, अमित लुंकड, राज ढाकलिया, रुपेश ढाकलिया, बिडकर, अमित लुंकडचा मॅनेजर व इतर ३० ते ४० जण आठ-दहा ट्रॅक्टर, दोन-तीन डंपर आणि वॉटर टँकर घेऊन आले असून त्यांनी साईटच्या समोरील दोन्ही गेटचे पत्रे तोडले आहेत. त्यांनी त्यांची सर्व वाहने प्लॉटमध्ये घुसवली आहेत.
त्यानंतर फिर्यादी व त्यांचा मुलगा तातडीने वडगाव शेरी येथील प्लॉटवर गेले. पोलिसही तेथे आले. तेव्हा अमित लुंकड याने त्याच्या साथीदारांना फिर्यादीला मारण्याच्या धमक्या देत, “इथून तुम्ही निघून जा, हा आमचा प्लॉट आहे,” असे सांगितले.
पोलिसांनी फिर्यादी व अमित लुंकड यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यावेळी फिर्यादी यांनी अमित लुंकडच्या गाडीत हत्यारे असल्याचा आरोप केला. तसेच, फिर्यादी यांच्या ‘बंदुके’ नावाच्या वॉचमनला मारहाण करण्यात आल्याने अमित लुंकड गाडीत बसून पळून गेल्याचेही फिर्यादींनी म्हटले आहे.
लुंकड आयुक्तांच्या नावाने देत होता धमक्या...
दरम्यान, प्लॉटवर आलेल्या अमित लुंकड याने दुगड यांच्या कर्मचाऱ्यांना, फिर्यादींना तसेच घटनास्थळी आलेल्या विमानतळ पोलिसांना पोलिस आयुक्तांच्या नावाने धमक्या दिल्याचे फिर्यादींनी सांगितले. पोलिस आयुक्तांना याबाबत कोणतीही कल्पना नसताना उपस्थितांकडे त्यांच्या नावाचा वापर करत, तसेच त्यांना फोन लावल्यासारखे भासवत तो परिसरात दहशत माजवत होता, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी प्लॉटचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न, धमक्या आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड करत आहेत.
Web Summary : Pune: Builder Amit Lunkad and accomplices face charges for forcibly attempting to seize a plot in Wadgaon Sheri, assaulting security, and threatening individuals, leading to a police investigation.
Web Summary : पुणे: बिल्डर अमित लुंकड़ और साथियों पर वडगांव शेरी में एक प्लॉट पर जबरन कब्जा करने, सुरक्षाकर्मियों पर हमला करने और व्यक्तियों को धमकाने के आरोप लगे हैं, जिसके कारण पुलिस जांच कर रही है।