Pune Crime : चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 13:23 IST2026-04-14T13:18:56+5:302026-04-14T13:23:49+5:30
Pune Crime - चिन्मय विभूती आश्रमात ऑगस्ट २०२५ पासून बासरी वादनाचे शिक्षण घेण्यासाठी आली होती.

Pune Crime : चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
कोळवण ( पुणे जि. ) : कोळवण येथील चिन्मय विभूती आश्रमात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी पौड पोलीस ठाण्यात खबरी जबाब नोंदविला आहे.
पौड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेणुका हर्षवर्धन लिखीते (वय २५) ही कोळवण येथील चिन्मय विभूती आश्रमात ऑगस्ट २०२५ पासून बासरी वादनाचे शिक्षण घेण्यासाठी आली होती. तिचे कुटुंब मध्यप्रदेशमध्ये राहत असून, ती आश्रमात एकटी राहत होती. गेल्या दोन दिवसांपासून रेणुका फोन उचलत नसल्याने तिच्या वडिलांनी नातेवाईकांना तिच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.
दि. ६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांनी आश्रमात जाऊन पाहणी केली असता, तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. संशय आल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, रेणुका ही खिडकीच्या ग्रीलला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. तिचा मृत्यू सायंकाळी साडेसहा वाजण्यापूर्वी झाल्याचे डॉक्टरांनी नमूद केले असून, या प्रकरणाची नोंद एम.एल.सी. क्रमांक १८३/२०२६ अशी करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर शेख करीत आहेत.