हृदयद्रावक घटना..! ओढ्याजवळ खेळताना तोल जाऊन १० वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 19:34 IST2026-04-23T19:33:18+5:302026-04-23T19:34:14+5:30
घराजवळील ओढ्याजवळ खेळत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला.

हृदयद्रावक घटना..! ओढ्याजवळ खेळताना तोल जाऊन १० वर्षीय मुलाचा मृत्यू
अवसरी ( पुणे जि. ) - आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका १० वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे. अधिकच्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव कृष्णा प्रशांत चवरे असे असून तो इयत्ता चौथीत शिक्षण घेत होता. बुधवारी दुपारच्या सुमारास घराजवळील ओढ्याजवळ खेळत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह आणि खोलीमुळे त्याला बाहेर पडता आले नाही.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मुलाला बाहेर काढून तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. कृष्णा हा अभ्यासात हुशार आणि मनमिळावू स्वभावाचा असल्याने शिक्षक व मित्रांमध्ये तो लाडका होता. त्याच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुरुवारी शाळेत शोकसभा घेऊन त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.