द्रुतगतीवर बंदी असूनही जुन्या महामार्गावर वाहतूक सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 16:27 IST2026-04-24T16:26:45+5:302026-04-24T16:27:14+5:30
- नागरिकांनी प्रवास करण्याचे टाळल्याचे चित्र, डोंगरगाव-कुसगाव पुलाचे काम वेगात सुरू

द्रुतगतीवर बंदी असूनही जुन्या महामार्गावर वाहतूक सुरळीत
लोणावळा :पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव–कुसगाव परिसरात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला सध्या वेग आला असून, प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या या कामात सध्या पुलाचे शटरिंग काढणे, तसेच रंगकामाची प्रक्रिया सुरू आहे. या कामासाठी द्रुतगती महामार्गावरील वाहतूक दोन दिवस तात्पुरती पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. वाहतूक बंदीमुळे मावळ तालुक्यातील जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर वाहनांची गर्दी होईल, असे चित्र वाटत असतानाच नागरिकांनी या काळात प्रवास करण्याचे टाळल्याने जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर वाहनांची गर्दी न होता वाहतूक सुरळीत सुरू होती.
गुरुवारी मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी १२ ते ३ या वेळेत बंद ठेवण्यात आली आहे, तर शुक्रवारी याच वेळेत पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. मात्र, प्रत्यक्षात मंगळवारी सकाळी ११ वाजेपासूनच वाहतूक थांबवण्यात आल्याने वाहनचालकांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला. गुरुवारी मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवली होती, तर शुक्रवारी पुण्याकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात येणार आहे.
दरम्यान, बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पही अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांत तो पूर्णत्वास जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकल्पातील महत्त्वाचे टप्पे पूर्ण करण्यासाठी संबंधित ठिकाणी कामाचा वेग वाढवण्यात आला आहे. विशेषतः ‘मिसिंग लिंक’ची सुरुवात होणाऱ्या भागातील उड्डाणपुलासाठीच हा विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आल्याचे समजते.