पुणे: गेल्यावर्षी २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले. या हल्ल्याने अनेकांचे कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त झाले. या हल्ल्यात कुणाचे सौभाग्य हिरावले, कुणाची कूस उजाडली तर कुणाच्या डोक्यावरचे भावाचे छत्र कायमचे हरपले. वेळ पुढे सरकली असली तरी त्या घटनेच्या जखमा आजही ताज्याच असल्याची भावना हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केली. या हल्ल्यानंतर भारतीयांच्या भावनांचा आदर राखत आपल्या जवानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या ऑपरेशनला काल एक वर्ष पूर्ण झाले.
जोपर्यंत शेवटचा दहशतवादी संपत नाही, तोपर्यंत हे ऑपरेशन थांबता कामा नये. पहलगाम हल्ल्यातील २६ जणांचा मृत्यू तेव्हाच सार्थकी लागेल जेव्हा सीमेपलीकडील दहशतवादाचे कारखाने कायमचे उद्ध्वस्त होतील. वर्षात एकदातरी ‘ऑपरेशन सिंदूर’ व्हायलाच पाहिजे, अशी पाकिस्तनाच्या भेकड हल्ल्यात आपले वडील गमावलेल्या आसावरी जगदाळे यांची मागणी आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २६ निष्पाप नागरिकांच्या आठवणी आजही त्यांच्या घराघरांत जपल्या जात आहेत. काही कुटुंबांनी गेल्या वर्षभरात घरात मिठाई बनवलेली नाही, तर काहीजण दर महिन्याच्या २२ तारखेला अन्नदान करून आपल्या प्रियजनांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये २६ निरपराध भारतीयांचे रक्त सांडले गेले. देशात संतापाची लाट होती. केंद्र सरकारने केवळ निषेध न नोंदवता ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला. अवघ्या १५ दिवसांत, म्हणजेच ७ मे च्या मध्यरात्री भारतीय वायू दलाच्या लढाऊ विमानांनी सीमा ओलांडली आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा प्रारंभ झाला.
या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याला काल एक वर्ष पूर्ण झाले. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याने सीमापार कारवाई करत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर जोरदार प्रहार केला होता. या कारवाईने संपूर्ण देशात अभिमानाची भावना निर्माण झाली होती. जवानांच्या धाडसी कारवाईची आठवण आजही नागरिकांच्या मनात ताजी आहे. मात्र, हल्ल्यानंतर वर्ष उलटूनही पहलगाम अद्याप पूर्णपणे पूर्वपदावर आलेले नाही.
यंदाच्या पर्यटन हंगामात पहलगाम सुने सुने
पहलगाम हल्ल्यामुळे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेली बैसरन व्हॅली अजूनही बंद आहे. याचा स्थानिक पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.तर अनेक पर्यटकांनी पहलगामला जाणे टाळले. सुरक्षेच्या दृष्टीने आजही परिसरात मोठ्या प्रमाणावर जवान तैनात आहेत. डोंगराळ भागात १५ ते २० जवानांच्या छोट्या तुकड्या सतत गस्त घालताना दिसतात. पहलगाम हल्ल्याने देशाला हादरवले होते. मात्र त्या वेदनांमधून उभे राहत भारतीय जवानांनी दाखवलेले शौर्य देशवासीयांसाठी कायम प्रेरणादायी ठरत आहे.
ऑपरेशन सिंदूरला आज एक वर्ष पूर्ण झाले. ७-८ मे च्या रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर अचूक हल्ले करून सुमारे २५० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि पहलगाम येथे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा कठोर बदला घेतला. आज भारताने मोठ्या प्रमाणावर संरक्षण सामग्रीची निर्यात सुरू केली असून भारतीय संरक्षण उद्योग झपाट्याने विकसित होत आहे. स्वदेशी ड्रोन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित प्रणाली, आधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र आणि प्रगत क्षेपणास्त्र क्षमता यामुळे भारतीय सैन्य अधिक सक्षम बनत आहे. त्यामुळे भविष्यात पाकिस्तान किंवा चीनने पुन्हा भारताविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली, तर त्याला कठोर, अचूक आणि प्रभावी प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. - हेमंत महाजन, ब्रिगेडियर नि.
Web Summary : A year after the Pahalgam terror attack and Operation Sindoor, victims' families still grieve. Tourism is down, Baisaran Valley remains closed, and security is tight. Locals remember the fallen and seek justice, urging continued action against terrorism.
Web Summary : पहलगाम आतंकी हमले और ऑपरेशन सिंदूर के एक साल बाद भी पीड़ित परिवार शोक में हैं। पर्यटन कम हुआ है, बैसरन घाटी बंद है, और सुरक्षा कड़ी है। स्थानीय लोग शहीदों को याद करते हैं और न्याय चाहते हैं, आतंकवाद के खिलाफ निरंतर कार्रवाई का आग्रह करते हैं।