राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
By राजू हिंगे | Updated: June 10, 2025 20:36 IST2025-06-10T20:35:34+5:302025-06-10T20:36:31+5:30
सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असेल त्यालाच राष्ट्रवादी कॉग्रेस संधी देणार आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. सत्ता येईल आणि जाईल, पण पुरोगामी विचार जिवंत राहिले पाहिजेत. आपल्या सगळ्यांच्या अधिकारांचे रक्षण होणे गरजेचे आहे. विचारांशी कधीही तडजोड केली जाणार नाही. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असेल त्यालाच राष्ट्रवादी कॉग्रेस संधी देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टरधर्मवाद मान्य नाही आणि भविष्यातही मान्य असणार नाही. शोषित, वंचित, मागासवर्गीय तसेच अल्पसंख्यांक समाजासाठी काम करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहिला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, मला आजही १० जून १९९९ हा दिवस आठवतो. शरद पवार आणि इतर काही मान्यवरांनी एकत्र येत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत पक्षाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आपल्या पक्षाला कधीही बहुमत मिळालं नाही. आपल्याला नेहमीच सत्तेत सहभागी व्हावं लागलं. कारण आधीपासूनच राजकारणाची अशी परिस्थिती निर्माण झाली की एका पक्षाची सत्ता येण्याचे दिवस संपले आहेत. कारण केंद्रात देखील कुणाला यूपीए किंवा कोणाला एनडीए अशी आघाडी आणि युती करावी लागल्याची परिस्थिती देशाने पाहिली आहे.
कॉग्रेसेने दहशतवाद्यांवर काहीच कारवाई केली नाही
भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) बरोबर जाण्याचा प्रयत्न २०१४ पासून सुरू होता. त्याबाबत दोन ते तीन वेळा अंतिम निर्णय देखील झाला होता. मात्र त्यानंतर भूमिका बदलण्यात आली. काँग्रेसचे सरकार असताना २६/११ चा हल्ला झाला. त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग होते. तर शरद पवार मंत्रिमंडळात होते. त्यावेळी दहशतवाद्यांवर काहीही कारवाई झाली नाही. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. २६ नागरिकांना धर्माच्या आधारावर हत्या करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत काय करू शकते हे करून दाखविले, असे राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.