मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण; दिग्विजय पाटील यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 12:48 IST2026-05-17T12:47:30+5:302026-05-17T12:48:35+5:30
या प्रकरणात मुख्य आरोपी शीतल किसनचंद तेजवानी विरोधात पुणे पोलिसांनी १८८६ पानांचे आरोपपत्र यापूर्वी दाखल करण्यात आले

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण; दिग्विजय पाटील यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल
पुणे : मुंढवा येथील चाळीस एकर सरकारी जमिनीच्या बेकायदा विक्री प्रकरणात सहआरोपी अमेडिया कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात मुख्य आरोपी शीतल किसनचंद तेजवानी विरोधात पुणे पोलिसांनी १८८६ पानांचे आरोपपत्र यापूर्वी दाखल करण्यात आले आहे. त्या वेळी सह आरोपी दिग्विजय पाटील विरोधात तपास सुरू होता. त्यानंतर आता १८० पानांचे पुरवणी आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. मुंढवा येथील ४० एकर जमीन भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाच्या मालकीची आहे. या जमिनीच्या मूळ वतनदारांच्या वारसदारांचे कथित कुलमुखत्यार (पॉवर ऑफ ॲटर्नी) म्हणून तेजवानीने ही जमीन परस्पर अमेडिया कंपनीला बेकायदा विकली. तब्बल १८०० कोटी रुपये किमतीच्या या जमिनीचा व्यवहार ३०० कोटी रुपयांमध्ये झाला.
या बेकायदा व्यवहाराची दस्तनोंदणी करताना कोट्यवधी रुपयांचे मुद्रांक शुल्क चुकवून सरकारची फसवणूक करण्यात आली, असे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाच्या तपासात मिळालेली माहिती, तसेच दस्तऐवजाची पाहणी केल्यानंतर या प्रकरणातील आरोपपत्रात पाटील यांचे नाव समाविष्ट करण्यात आले.