मावळ बाजार समिती अखेर बरखास्त, उपनिबंधकांकडून प्रशासकाची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 10:53 IST2026-04-16T10:53:03+5:302026-04-16T10:53:22+5:30

- उपनिबंधकांचे आदेश : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची भाजपवर कुरघोडी; पक्षांतर्गत असंतोष, फाटाफूट आणि राष्ट्रवादीच्या तेरा संचालकांच्या राजीनाम्यामुळे बदलली समीकरणे; भाजपला साथ देणाऱ्या संचालकांना फटका 

Maval Market Committee finally dissolved, Deputy Registrar appoints administrator | मावळ बाजार समिती अखेर बरखास्त, उपनिबंधकांकडून प्रशासकाची नियुक्ती

मावळ बाजार समिती अखेर बरखास्त, उपनिबंधकांकडून प्रशासकाची नियुक्ती

वडगाव मावळ : नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अखेर बरखास्त होऊन बुधवारी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. बाजार समितीच्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत १८ संचालक निवडून आले होते. त्यात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे १६, काँग्रेस व भाजपचा प्रत्येकी एक संचालक निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीची सत्ता होती. परंतु विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीमुळे काही संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपाचे पाच, राष्ट्रवादीचे १२ व काँग्रेसचा एक संचालक अशी संख्या झाली. सभापतिपदी संभाजी शिंदे, तर उपसभापतिपदी नामदेव शेलार यांची नियुक्ती झाली होती. मात्र, ठरल्याप्रमाणे इतर संचालकांना संधी न देता या दोघांनी तीन वर्षे पदे न सोडल्याने असंतोष वाढत गेला.

या पार्श्वभूमीवर असंतुष्ट संचालकांनी एकत्र येत अविश्वास ठरावाची तयारी केली. त्याची चाहुल लागताच सभापती व उपसभापतींनी राजीनामे दिले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या निवडीत राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही अंतर्गत फुटीमुळे भाजपला सभापतीपद पटकावण्यात यश आले. मात्र, हा विजय काही तासांपुरताच ठरला. या घडामोडींची गंभीर दखल घेत आमदार सुनील शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे व तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी राष्ट्रवादीच्या संचालकांची तातडीची बैठक घेऊन सर्वांना राजीनाम्याचे आदेश दिले.

या आदेशानुसार राष्ट्रवादीच्या १३पैकी नऊ संचालकांनी तत्काळ, तर उर्वरित चार जणांनी दुसऱ्या दिवशी राजीनामे दिले. बहुतांश संचालक बाहेर पडल्याने बाजार समिती बरखास्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजपचे सभापतीपदाचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच भंगले. दरम्यान, संचालक मंडळ अस्तित्त्वात नसल्यामुळे समितीचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले आणि पहिली बैठकही कोरमअभावी मर्यादित राहिली.

या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सहायक निबंधकांकडून जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात आला. जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी आदेश काढत मावळ तालुका बाजार समिती बरखास्त करून मावळचे सहायक निबंधक नवनाथ अनपट यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली असून, आता सर्व अधिकार त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पक्षांतर्गत असंतोष, फाटाफूट आणि त्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी घेतलेला निर्णय यामुळे समीकरण बदलले. अखेर बाजार समिती बरखास्त होऊन प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सभापतिपद ठरले औटघटकेचे

विधानसभेवेळी मावळ तालुक्यात आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादीच्या काही संचालकांनी भाजपला साथ देत मतदान केले होते. मात्र, या निर्णयामुळे त्यांनाही फटका बसला आहे. पूर्वी राष्ट्रवादीमध्ये असलेले व नंतर भाजपमध्ये गेलेले सुभाष जाधव यांनी भाजपकडून निवडणूक लढवत राष्ट्रवादीचे काही संचालक फोडून सभापतिपद मिळवले होते. परंतु, ते औटघटकेचे ठरले.

Web Title : मावल बाजार समिति भंग; राजनीतिक उथल-पुथल के बाद प्रशासक नियुक्त

Web Summary : राजनीतिक बदलाव के कारण मावल बाजार समिति भंग कर दी गई। आंतरिक विवादों और इस्तीफों ने प्रशासक की नियुक्ति का मार्ग प्रशस्त किया। गुटबाजी ने सत्ता की गतिशीलता को प्रभावित किया, जिससे भाजपा की अल्पकालिक अध्यक्षता समाप्त हो गई।

Web Title : Maval Market Committee Dissolved; Administrator Appointed After Political Turmoil

Web Summary : Political shifts led to the dissolution of the Maval Market Committee. Internal disputes and resignations paved the way for administrator appointment. Factionalism impacted power dynamics, ending BJP's short-lived chairmanship.