कामशेत : राजमाची परिसरातील शिरदे डॅमच्या बँक वॉटरमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या करण ज्ञानदेव ठोंबरे (वय २०, रा. बालाजी विहार, कोडोली, सातारा) व आर्या सुशांत बंडावार (२०, रा. गोंदिया) यांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि. १७) घडली.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल प्रकाश पवार (१९, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. सुजल पवार व त्यांचे मित्र-मैत्रिणी रविवारी सकाळी राजमाची किल्ला परिसरात फिरण्यासाठी निघाले होते. त्यामध्ये करण ठोंबरे, आर्या बंडावार, आस्था टेंबरे, सृष्टी गवाडे व ज्योत्स्ना शेळके यांचा समावेश होता. जुना पुणे-मुंबई महामार्गाने प्रवास करत असताना त्यांनी वडगाव येथे नाश्ता केला. त्यानंतर राजमाची परिसरात पोहोचल्यानंतर गडावर न जाता शिरदे डॅम परिसरात जाण्याचे ठरवले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सर्वजण डॅमच्या बॅक वॉटर परिसरात पोहोचले. काही वेळ गप्पा मारत बसल्यानंतर आर्या बंडावार व ज्योत्स्ना शेळके पुढे गेल्या. त्या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने आर्या पाण्यात बुडू लागली. ज्योत्स्ना हिने मदतीसाठी आरडाओरडा केला. हे पाहून करण ठोंबरे तिला वाचवण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, त्यालाही पोहता येत नसल्याने तोदेखील पाण्यात अडकला.
त्यांच्या मित्रांनी तसेच घटनास्थळी उपस्थित पर्यटकांनी दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तत्काळ डायल १०० वर संपर्क साधून पोलिसांना माहिती देण्यात आली. स्थानिक नागरिक, पोलिस व पर्यटकांच्या मदतीने दोघांना पाण्याबाहेर काढून ॲम्ब्युलन्सद्वारे महावीर हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच दोघांना मृत घोषित केले. सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार तपास करीत आहेत.
Web Summary : Two friends drowned at Rajmachi's Shirde Dam. A man tried to save a woman struggling in the water, but neither could swim. Both were declared dead at the hospital.
Web Summary : राजमाची के शिरडे डैम में दो दोस्तों की डूबने से मौत हो गई। एक युवक ने पानी में संघर्ष कर रही महिला को बचाने की कोशिश की, लेकिन दोनों तैर नहीं सके। अस्पताल में दोनों को मृत घोषित कर दिया गया।