Maharashtra: एकाच दिवशी दोन लाख उतारे डाऊनलोड, राज्याला ३६ लाखांचा महसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 01:47 PM2023-07-08T13:47:50+5:302023-07-08T13:50:01+5:30

राज्य सरकारलाही सुमारे ३६ लाख ६१ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला...

Maharashtra 2 lakh copies downloaded in a single day, revenue to state 36 lakhs | Maharashtra: एकाच दिवशी दोन लाख उतारे डाऊनलोड, राज्याला ३६ लाखांचा महसूल

Maharashtra: एकाच दिवशी दोन लाख उतारे डाऊनलोड, राज्याला ३६ लाखांचा महसूल

googlenewsNext

पुणे : राज्यात खरीप हंगामासाठी पीककर्जासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून, त्यासाठी आवश्यक असलेले सातबारा, खाते उतारे (आठ अ), फेरफार व मिळकत पत्रिका आदी उताऱ्यांना मागणी वाढली आहे. हे उतारे ऑनलाइन डाऊनलोड करताना बँकेसंदर्भात असलेल्या अडचणी दूर झाल्याने भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावरून गुरुवारी (दि. ६) राज्यात विक्रमी २ लाख १५ हजार उतारे डाऊनलोड झाले आहेत. यामुळे राज्य सरकारलाही सुमारे ३६ लाख ६१ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ई-फेरफार प्रकल्पांतर्गत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा, आठ-अ अर्थात खाते उतारा, मिळकत पत्रिका ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत. सप्टेंबर २०१९ पासून डिजिटली स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारे उपलब्ध झाले आहेत. तेव्हापासून आजवर ४ कोटी ३७ लाख ३६ हजार ९४६ सातबारा उतारे डाऊनलोड झाले आहेत. १ ऑगस्ट २०२० पासून खाते उतारे अर्थात ८ अ ऑनलाइन उपलब्ध झाले असून, आतापर्यंत १ कोटी ३० लाख ७२ हजार ५२७ उतारे डाऊनलोड झाले. त्यानंतर २१ जानेवारी २०२१पासून मिळकत पत्रिका उपलब्ध झाल्या. आतापर्यंत राज्यात ८ लाख १६ हजार ७७३ पत्रिका नागरिकांनी डाऊनलोड केल्या आहेत. १ ऑगस्ट २०२१ पासून फेरफार ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले. आतापर्यंत १३ लाख ५८ हजार ८५ फेरफार डाऊनलोड करण्यात आले. यातून आतापर्यंत ११२ कोटी ६१ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. राज्यात यापूर्वी एकाच दिवशी सर्वाधिक उतारे ३ एप्रिल रोजी डाऊनलोड करण्यात आले.

...म्हणून वाढला वापर

‘या पोर्टलवर जमा होणाऱ्या रकमांच्या संदर्भामध्ये बँक व्यवहार किंवा पोर्टल सेवेमधील अनियमितता यामुळे जी त्रुटी निर्माण होत होती, ती आता दूर करण्यात आली आहे. पोर्टलवरील बँका सक्षमपणे पैसे व्यवहारांतील समस्या सोडवून नागरिकास त्याने जमा केलेले पैसे परत करत आहेत. पोर्टलवरील वॉलेटमध्ये जमा रकमा या अधिकाराभिलेख डाऊनलोड करण्यासाठी केव्हाही वापरता येत आहेत. या सुगमतेमुळे पोर्टलचा वापर वाढला आहे. याखेरीज पेरणीचे दिवस असल्याने पीककर्ज इत्यादी बाबींसाठी सातबाराची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांनी या पोर्टलचा अधिक वापर केला आहे,’ अशी माहिती भूमी अभिलेख विभागाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाच्या राज्य संचालक सरिता नरके यांनी दिली.

प्रत्येक नागरिकाने आपल्या जमिनीशी संबंधित अधिकाराभिलेख म्हणजेच सातबारा व आठ अ हे त्यांनी ज्या हंगामामध्ये पीक लावले आहे, अशा प्रत्येक हंगामासाठी कायदेशीर पुरावा म्हणून या पोर्टलवरून डाऊनलोड करून संग्रही ठेवावे. तसेच आपल्या सातबारा उताऱ्यात काही त्रुटी असल्यासही उतारा डाऊनलोड करून ती दुरूस्त करता येते. त्यासाठी तलाठ्यांशी संपर्क साधावा.

- सरिता नरके, राज्य संचालक, माहिती व तंत्रज्ञान कक्ष, भूमी अभिलेख विभाग

Web Title: Maharashtra 2 lakh copies downloaded in a single day, revenue to state 36 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.