जागतिक बाजारपेठेत चढउतार सुरू असतानाही भारताची अर्थव्यवस्था भक्कम - निर्मला सीतारामन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 17:01 IST2026-04-24T17:00:53+5:302026-04-24T17:01:18+5:30
विशेषत: अमेरिकेने लादलेले निर्बंध आणि जागतिक अनिश्चिततेमुळे सध्या भारतीय निर्यातीला काही प्रमाणात फटका बसत आहे

जागतिक बाजारपेठेत चढउतार सुरू असतानाही भारताची अर्थव्यवस्था भक्कम - निर्मला सीतारामन
पुणे: सध्या संपूर्ण जगाची बाजारपेठ अस्थिरतेच्या काळातून जात असून, जागतिक पातळीवर निर्यातीला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारताची देशांतर्गत बाजारपेठ आणि येथील वाढता वापर हेच आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचे मुख्य इंजिन ठरले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
पुण्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नवीन स्थानिक मुख्य कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी स्टेट बँकेचे अध्यक्ष सी. श्रीनिवासुलू शेट्टी, केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव एन. नागराजू उपस्थित होते. जागतिक बाजारपेठेतील आव्हाने आणि भारताच्या भविष्यातील विकासाची दिशा यावर त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भाष्य केले. जागतिक स्तरावर निर्यातीची स्थिती मांडताना सीतारामन म्हणाल्या, “विशेषत: अमेरिकेने लादलेले निर्बंध आणि जागतिक अनिश्चिततेमुळे सध्या भारतीय निर्यातीला काही प्रमाणात फटका बसत आहे. परंतु, आपल्या निर्यातदारांच्या कौशल्याचे कौतुक करावे लागेल. या आव्हानांना न डगमगता ते सातत्याने नवनवीन जागतिक बाजारपेठा शोधत आहेत आणि आपला विकासदर टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.”
निर्यातीचे मूल्य देशासाठी महत्त्वाचे आहेच, पण सध्याच्या काळात अंतर्गत अर्थव्यवस्थेने देशाला मोठी साथ दिली आहे, असे त्यांनी नमूद केले. भारताचा विकासदर आजही जगात सर्वात वेगवान आहे आणि त्याचे श्रेय आपल्या देशांतर्गत अर्थव्यवस्थेला जाते. “जागतिक बाजारपेठेत चढउतार सुरू असतानाही भारताची अर्थव्यवस्था भक्कम उभी राहिली आहे. देशांतर्गत आर्थिक चक्राची गती कायम आहे. कृषी, उत्पादन, पर्यटन, आयटी आणि सेवा क्षेत्राला जर सातत्याने आणि शाश्वत पाठबळ मिळाले, तर भारताची विकासाची ही यशोगाथा कोणाही रोखू शकणार नाही,” असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
येत्या २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी बँकांनी केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित न राहता देशांतर्गत उत्पादन आणि कृषी क्षेत्राच्या मुळाशी पोहचणे आवश्यक आहे. एसबीआयने आपले मुख्य कार्यालय पुण्यात हलवून ग्राहकांच्या जवळ जाण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो देशांतर्गत विकास अधिक गतिमान करण्यासाठी पूरक ठरेल. शेतीमाल निर्यात असो वा स्थानिक लघुउद्योग, बँकांनी या क्षेत्रांची नस ओळखून त्यांना आर्थिक बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. जागतिक बाजारपेठेवर लक्ष ठेवतानाच भारताने आपल्या अंतर्गत ताकदीवर भर दिल्यास आपण विकसित राष्ट्राचे ध्येय वेळेत साध्य करू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
शेट्टी म्हणाले, स्टेट बँकेने राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, पुणे मेट्रो, पुणे रिंग रोड आणि विविध औद्योगिक विकास प्रकल्पांचा समावेश आहे. महाराष्ट्र सर्कलसाठी पुणे हे व्यवसायाचे मोठे केंद्र असून, राज्यातील एकूण ठेवींमध्ये २७ टक्के आणि कर्जांमध्ये ३४ टक्के वाटा पुण्याचा आहे. नागराजू यांनीही मुख्यालयाच्या माध्यमातून उद्योगांपासून सामान्यांना सर्व सेवा देण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.