जोरदार पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान; दर भिडले गगनाला; एक जुडी ५० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:03 IST2025-09-30T10:03:29+5:302025-09-30T10:03:35+5:30
Pune Vegetables Price Hike: पुणे, नाशिक, मराठवाड्यासह सर्व विभागांत पाऊस झाल्याने पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे

जोरदार पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान; दर भिडले गगनाला; एक जुडी ५० रुपये
पुणे : राज्यातील सर्व भागांत गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. गेले अनेक दिवसांपासून शहरात जिल्ह्यासह संततधार पावसामुळे मार्केटयार्ड बाजारात पालेभाज्यांची आवक कमी होत आहे. आवक कमी झाल्याने सर्व पालेभाज्यांचे (Vegetables) दर तेजीत आहेत. किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या एका जुडीचे दर ४० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
पावसामुळे फळभाज्या, पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. बाजारात पालेभाज्यांची आवक गेल्या आठवड्यापासून कमी प्रमाणावर होत असून, सर्व प्रकाराच्या पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.
मार्केट यार्डातील तरकारी विभागात सोमवारी ८० हजार ते एक लाख जुडी कोथिंबिर, मेथी १० ते १५ हजार जुडी, शेपू ८ ते १० हजार जुडी, राजगिरा ८ ते १० हजार जुडी, कांदापात १० ते १५ हजार जुडी, मुळे ३ ते ४ हजार जुडी अशी आवक झाली. नेहमीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक तशी कमी प्रमाणावर होत आहे. पुणे, नाशिक, मराठवाड्यासह सर्व विभागांत पाऊस झाल्याने पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्या खराब होण्याचे प्रमााण जास्त असते. नवीन लागवडीसाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. पालेभाज्यांचे दर महिनाभर तेजीत राहणार आहेत, अशी माहिती सूयर्वंशी यांनी दिली.
भेंडी, राजगिरा महाग
नवरात्रोत्सवात उपवासासाठी भेंडी आणि राजगिऱ्याला मागणी वाढते. भेंडी आणि राजगिऱ्याची आवक कमी प्रमाणावर होत आहे. किरकोळ बाजारात राजगिऱ्याच्या एका जुडीचे दर ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो भेंडीचे दर १२० ते १६० रुपयांपर्यंत आहेत. गवारीचे दर तेजीत असून, एक किलो गवारीचे दर १४० ते २०० रुपये किलो आहेत, असे किरकोळ बाजारातील पालेभाजी व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.
असे आहेत पालेभाज्यांचे जुडीचे दर
पालक - ४० ते ५० रुपये
मेथी - ३० ते ४० रुपये
कोथिंबीर - ३० ते ३० रुपये
राजगिरा - ५० ते ६० रुपये