लग्न सोहळ्यात डीजेचे रॅक; मोठमोठ्या आवाजाने ग्रामस्थ हैराण, अखेर दौंड तालुक्यातील 'या' गावात डीजेबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:43 IST2025-11-26T17:43:25+5:302025-11-26T17:43:39+5:30

आवाजाच्या सर्व मर्यादा ओलांडत मोठमोठे डीजे लावले जात असून जास्तीत जास्त रॅक लावण्याची स्पर्धा लागली जाते. एकमेकांच्या स्पर्धेतून प्रचंड खर्च करण्याची तयारी दर्शवली जाते.

DJ's racket at wedding ceremony; Villagers shocked by loud noise, finally DJ ban in 'Ya' village in Daund taluka | लग्न सोहळ्यात डीजेचे रॅक; मोठमोठ्या आवाजाने ग्रामस्थ हैराण, अखेर दौंड तालुक्यातील 'या' गावात डीजेबंदी

लग्न सोहळ्यात डीजेचे रॅक; मोठमोठ्या आवाजाने ग्रामस्थ हैराण, अखेर दौंड तालुक्यातील 'या' गावात डीजेबंदी

राहू: पिंपळगाव (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीच्या आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत गावासाठी डी.जे. बंदीचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच कविता कापरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेमध्ये वरील ठराव एकमताने घेण्यात आला आहे.तालुक्यात डीजे बंदी करणारे पिंपळगाव हे पहिले गाव ठरले असून निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
             
दौंड तालुक्यात सध्या सर्वत्र लग्नसराई जोरदारपणे सुरू आहे. पिंपळगाव किंवा बहुधा सर्वच गावामध्ये लग्नाच्या आदल्या दिवशी ग्रामदैवतांना पाया पडण्याच्या परंपरा आहे. परंपरेच्या नावाखाली डीजे लावून मिरवणूक काढण्याची सुरुवात झाली आहे. मिरवणुकीत गावातील नववधू किंवा नवरदेव यांच्यासोबत युवकांचा भरणा असतो. मुख्य चौकापासून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत, मुख्य बाजारपेठ मार्गे डीजे लावत ही मिरवणूक काढली जाते. यावेळी डेसिबल आवाजाच्या सर्व मर्यादा ओलांडत मोठमोठे डीजे लावले जातात. डीजेचे जास्तीत जास्त रॅक लावण्याची स्पर्धा लागली जाते. एकमेकांच्या स्पर्धेतून पाहिजे तो खर्च करण्याची तयारी केली जाते. या डीजेचा आवाजाचा प्रतिकूल परिणाम रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ग्रामस्थ व जनावरांवरती होतो. गावामध्ये अनेक वयोवृद्ध ग्रामस्थ व पेशंट आहेत. डीजेच्या आवाजामुळे त्यांना दार लावून बसण्याची वेळ येते. तसेच अनेक गाई म्हशी डीजे च्या आवाजामुळे घसरून पडल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे मुख्य बाजारपेठेतील अनेक ग्रामस्थांमध्ये डीजे बंदी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली होती.

ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांच्या मागणीवरून डीजे वरील बंदी हा विषय पत्रिकेमध्ये घेण्यात आला. ग्रामसभेमध्ये ग्रामस्थ शंकर शेलार, संभाजी नातू, राजेंद्र दिवेकर, तात्या गाडेकर, सतीश नातू यांच्यासह अनेक महिलांनी जोरदार मागणी केली. याबाबत अनेकांनी आपापली मते मांडली. शेवटी सर्वानुमते डीजे बंदीचा निर्णय घेण्यात आला. ठरावाची अधिकृत प्रत तहसीलदार दौंड, गटविकास अधिकारी दौंड व पोलीस निरीक्षक यवत यांना देण्यात येणार आहे. याचबरोबर २५ डिसेंबर पूर्वी संपूर्ण कर भरल्यास ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.

पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देणे गरजेचे
            
डीजे वरील बंदी ही ग्रामस्थांमधून आलेली मागणी आहे. आज पासून संपूर्ण परिसरासाठी डीजे बंदी करत आहोत. त्याऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. भविष्यात या बंदीचे उल्लंघन केल्यास यवत पोलिसांना किंवा प्रशासनाला कळवले जाईल. - कविता कापरे ( सरपंच)

Web Title: DJ's racket at wedding ceremony; Villagers shocked by loud noise, finally DJ ban in 'Ya' village in Daund taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.