वीर धरणातून विसर्ग थांबवला! नीरा खोऱ्यातील भाटघर, नीरा देवघर, वीर व गुंजवणी धरणात पाणीसाठा किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 10:00 IST2025-07-23T10:00:12+5:302025-07-23T10:00:22+5:30
गेल्या आठवडाभरापासून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमालीची घटली आहे

वीर धरणातून विसर्ग थांबवला! नीरा खोऱ्यातील भाटघर, नीरा देवघर, वीर व गुंजवणी धरणात पाणीसाठा किती?
नीरा : काही दिवसांपासून नीरा खोऱ्यातील धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दिली आहे. यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक मंदावली आहे. नीरा खोऱ्यातील भाटघर, नीरा देवघर, वीर व गुंजवणी या चार धरणात ४८ हजार ३२९ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठ्याचे क्षमता आहे. आज रोजी या चारही धरणात ३९ हजार ८०४ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठ उपलब्ध आहे. बुधवारी (दि.२२) सकाळी नीरा नदीच्या चारही धरणात एकूण पाणीसाठ्याच्या ८२.३६ टक्के स्थिर झाला आहे. त्यामुळे वीर धरणाच्या सांडव्यातून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग पुर्णपणे थांबविण्यात आला आहे.
गेल्या आठवडाभरापासून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमालीची घटली आहे. धरणातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून वीर धरणाच्या सांडव्यातून होणारा विसर्ग थांबला असला, तरी नीरा डावा कालवा व उजव्या कालव्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी विसर्ग सुरू आहे.
धरण एकुण क्षमता(दशलक्ष घनफूट) आजचा पाणीसाठा (दशलक्ष घनफूट) टक्के
भाटघर २३,५०२. २०,९८०. ८८.२१
नीरा देवघर ११,७२९. ८,५८४. ७१.६०
वीर ९,४०८. ८,१४५. ८६.५८
गुंजवणी ३,६९०. २,५३८. ६८.५९
एकुण ४८,३२९. ३९,८०४. ८२.३६
नदीकाठच्या रहिवाशांना दिलासा
पावसाचे प्रमाण घटल्याने आणि धरणातून होणारा विसर्ग थांबल्यामुळे, नीरा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका टळला आहे. यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, भविष्यात पावसाची स्थिती आणि पाणी व्यवस्थापनावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. पुढिल काळात पावसाची सद्यःस्थितीत लक्षात घेऊन धरण व्यवस्थापनाबाबत योग्य निर्णय घेतले जातील, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.