नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने एक मोठी यशाची कामगिरी केली आहे. सीबीआयने या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी याला पुण्यातून अटक केली आहे. कुलकर्णी हा मूळचा लातूरचा रहिवासी असून, तो नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने परीक्षा प्रक्रियेशी संबंधित रसायनशास्त्र विषयाचा व्याख्याता म्हणून कार्यरत होता. त्याच्याकडे नीट परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिका उपलब्ध होत्या, असा गंभीर आरोप सीबीआयने केला आहे. याप्रकरणी सीबीआयचा पुढील तपास सुरू आहे.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात मुख्य आरोपी पी. व्ही. कुलकर्णी याने या प्रकरणातील दुसरी महिला आरोपी मनीषा वाघमारे हिच्यासोबत मिळून पुण्यातील आपल्या निवासस्थानी निवडक विद्यार्थ्यांसाठी एका विशेष शिकवणी वर्गाचे आयोजन केले होते.या गुप्त सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेतील प्रश्न, त्याचे पर्याय आणि अचूक उत्तरे लिहून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या वहीत नोंदवून घेतलेले हे प्रश्न ३ मे २०२६ रोजी झालेल्या प्रत्यक्ष नीट परीक्षेतील रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळल्याचे सीबीआयच्या तपासात स्पष्ट झाले. या विशेष सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांकडून मध्यस्थांमार्फत लाखो रुपये उकळण्यात आले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाने केलेल्या लेखी तक्रारीनंतर, १२ मे २०२६ रोजी सीबीआयने या प्रकरणी अधिकृत गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल होताच सीबीआयने विशेष तपास पथके तयार करून देशभरात वेगाने चक्र फिरवली. गेल्या २४ तासांत सीबीआयने देशभरातील विविध ठिकाणी छापेमारी केली असून, या कारवाईत अनेक महत्त्वाची कागदपत्रे, डिजिटल पुरावे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
देशभरातून ७ आरोपी गजाआड
नीट पेपरफुटीच्या जाळ्याचा पर्दाफाश करताना सीबीआयने आतापर्यंत देशातील विविध शहरांमधून एकूण ७ आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या ७ आरोपींपैकी ५ आरोपींना न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सीबीआयचा तपास सुरू
तपासादरम्यान प्रश्नपत्रिका फुटीचा मूळ स्रोत आणि विद्यार्थ्यांना लाखो रुपयांच्या बदल्यात या रॅकेटमध्ये ओढणारे मध्यस्थ यांची ओळख पटली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे खूप खोलवर पसरलेले असून, आगामी चौकशीत आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
Web Summary : CBI arrested P.V. Kulkarni, NEET paper leak mastermind, in Pune. He allegedly leaked the paper with Manisha Waghmare, running a coaching class where students received exam questions and answers for a fee. CBI investigations continue.
Web Summary : CBI ने पुणे में NEET पेपर लीक के मास्टरमाइंड पी.वी. कुलकर्णी को गिरफ्तार किया। आरोप है कि उन्होंने मनीषा वाघमारे के साथ मिलकर पेपर लीक किया, कोचिंग क्लास चलाई जहाँ छात्रों को शुल्क लेकर परीक्षा प्रश्न और उत्तर मिले। CBI जांच जारी है।