-शर्मिला फडके (ख्यातनाम कला समीक्षक, लेखिका)
सामाजिक, वैचारिक परिवर्तनाचं प्रतिबिंब सर्वप्रथम कलेत उमटतं. एखादं वैशिष्ट्यपूर्ण चित्र कला इतिहासाच्या विशिष्ट टप्प्याचं प्रतिनिधित्व करणारं ठरतं, त्यावेळी ते सामाजिक बदलाची वाटचालही अधोरेखित करतं. जॉ फ्रांस्वा मिले या फ्रेंच चित्रकाराने १८५७ साली चितारलेलं “द ग्लिनर्स” हे चित्र त्यापैकीच एक. ग्रामीण जीवन, श्रमाचं शांत, गंभीर चित्रण त्यात आहे. कष्टकरी स्त्रिया शेतात राबत आहेत. जाडेभरडे पोशाख, बळकट काटक शरीरयष्टी, चित्रातली एकंदरीतच तपकिरी, मळकट रंगसंगती उठून दिसते आहे.
नजरेला सुखावणारं काहीच नाही. निसर्ग आहे, पण त्यात आनंददायी हिरवाई नाही. उघडं आकाश आहे, तेही राखाडी, मळभ दाटलेलं. आयुष्य सोपं नाही, पण तरीही या वेचणी करणाऱ्या स्त्रिया मन लावून, एकाग्रतेनं आपलं काम करत आहेत. पारंपरिकरीत्या शेतात सुगी नंतर, कापणी होऊन गेल्यावर मातीत शिल्लक उरणारे धान्याचे दाणे वेचून त्यावर आपलं, कुटुंबाचं पोट त्या भरतात. कष्टपूर्वक, प्रतिष्ठेने जगतात. जॉ फ्रांस्वा मिले ज्या खेड्यात वाढला, तिथली ही प्रथा.
अनेक वर्षं तो या श्रमिक स्त्रियांची चित्रं रंगवत होता. चित्रात एखादा वीर योद्धा, धार्मिक दृश्य, भावस्पर्शी प्रेमजीवन रंगवण्यापेक्षा परिसरातील श्रमजीवी कामगारांचं चित्रण त्याने महत्त्वाचं मानलं. यात कोणत्याही प्रकारे दया, सहानुभूती अशा भावनांची निर्मिती होणार नाही याची काळजी त्याने घेतलेली स्पष्ट जाणवते.
१९व्या शतकाचा हा उत्तरार्ध. औद्योगिक क्रांती, शास्त्रीय शोध यामुळे मानवी जीवन, सांस्कृतिक वातावरण आमूलाग्र बदलत होतं. कलाक्षेत्रातले पारंपरिक नियम व प्रमाणे कालबाह्य ठरली होती. रोमँटिसिजम हा चित्रकलेत दीर्घकाळ लोकप्रिय असलेला टप्पा, त्यात निसर्ग, स्वप्न, भावना यांना महत्त्व होतं. पण सामान्य लोकांच्या खडतर आयुष्याला त्यात स्थान नव्हतं. १८४८च्या युरोपियन क्रांतीनंतर चित्रकारांनी ही कल्पनारम्य कलाशैली धुडकावून लावली. श्रमजीवींचं दैनंदिन वास्तव जीवन कलेत आणलं. भावनिक उद्रेकाची जागा साध्या, सत्य शैलीने घेतली, मध्यवर्ती ऐतिहासिक नायकाच्या जागी शेतकरी आला.
“द ग्लिनर्स” पहिल्यांदा, १८५७ साली पॅरिसच्या प्रतिष्ठित सलोनमध्ये प्रदर्शित झालं आणि उच्चवर्गीय चित्रसिकांमध्ये अत्यंत नकारात्मक, अस्वस्थ प्रतिक्रिया उमटली. समाजाच्या अगदी खालच्या स्तरातला कष्टकरी वर्ग इतका ग्लोरिफाय करायची गरज काय? असा संतप्त प्रश्न विचारला गेला, कलेमध्ये सामाजिक क्रांती आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त झाला.
सामान्य चित्रविषयाकरता मिलेने वापरलेला भव्य आकार (३३x४४ इंच) त्यात भर घालणारा होता. अत्यल्प किमतीत हे वादग्रस्त चित्र तातडीने एका लिलावात विकून सलोनमधून हटवलं गेलं. पुढे ते लुव्र संग्रहालयाला दान करण्यात आलं. कलेमध्ये वास्तववाद रुजविण्याचं काम मात्र द ग्लिनर्स ने पार पाडलं होतं. पुढे कुर्बे, दोमिये यांनी हे बीज जोपासलं, फुलवलं. व्हॅन गॉगच्या चित्रांवरही मिलेचा प्रभाव आहे. पॅरिसमधील म्युसे डी ऑर्समध्ये आता द ग्लिनर्स पाहायला मिळतं.
sharmilaphadke@gmail.com
Web Summary : Millet's 'The Gleaners' sparked controversy for glorifying the working class. Its realism influenced artists like Courbet and Van Gogh, challenging romanticism and depicting the everyday struggles of laborers. It now resides in the Musée d'Orsay.
Web Summary : मिले के 'द ग्लिनर्स' ने श्रमिक वर्ग को महिमामंडित करने के लिए विवाद खड़ा किया। इसकी यथार्थवाद ने कुर्बे और वान गाग जैसे कलाकारों को प्रभावित किया, रोमांटिकवाद को चुनौती दी और मजदूरों के रोजमर्रा के संघर्षों को दर्शाया। यह अब मुसी डी'ओर्स में है।