पुण्यात व्यावसायिकाची निवृत्त एसीपीकडून तब्बल अडीच कोटींची फसवणूक; धमकी दिल्याचाही आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 12:44 IST2026-04-20T12:44:07+5:302026-04-20T12:44:34+5:30

एक कोटींचा व्यवहार झाल्यावर संबंधित जमीनमालक जिवंत असतानाही ते मयत झाले असल्याचे खोटे सांगून व्यवहार पुढे ढकलण्यात आला

Businessman in Pune cheated of Rs 2.5 crore by retired ACP; also accused of threatening him | पुण्यात व्यावसायिकाची निवृत्त एसीपीकडून तब्बल अडीच कोटींची फसवणूक; धमकी दिल्याचाही आरोप

पुण्यात व्यावसायिकाची निवृत्त एसीपीकडून तब्बल अडीच कोटींची फसवणूक; धमकी दिल्याचाही आरोप

पुणे : जमीन खरेदीत मोठा फायदा करून देण्याच्या बहाण्याने एका निवृत्त सहायक पोलिस आयुक्ताने व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, एका व्यक्तीच्या नावाने खोटे बँक खाते उघडून आणि बनावट कंपनीच्या नावाने व्यवहार करून रक्कम उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी त्याची पत्नी, मुलासह पाच जणांविरोधात चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशील शंकरराव कदम, नंदा कदम, अनिकेत कदम (तिघेही रा. तळवलकर जिमसमोर, फर्ग्युसन रस्ता), दत्ता केदारी (रा. बोरज, जि. पुणे) आणि बाळासाहेब आर. वाळुंज (रा. कामशेत, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

अभिजीत विलास उंद्रे (वय ३५, रा. मांजरी खुर्द) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. ही घटना डिसेंबर २०१६ ते २१ मे २०२५ या कालावधीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कदम हा पुणे पोलिस दलातून सहायक पोलिस आयुक्त म्हणून निवृत्त झाला आहे. तक्रारदार हे व्यावसायिक आहे. कदम याने मुंबई येथील बालकिशन गुप्ता यांची खेड तालुक्यातील बोरज येथे मोक्याच्या ठिकाणी १२ एकर जमीन असून, ती विक्रीसाठी असल्याचे तक्रारदार यांना सांगितले. त्या जमिनीत गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे आमिष दाखवले.

तक्रारदारांकडील रक्कम स्वीकारण्यासाठी बालकिशन गुप्ता यांच्या नावाने खोटे बँक खाते उघडण्यात आले आणि तक्रारदारांकडून ५० लाख रुपयांची पे-ऑर्डर घेण्यात आली. तसेच, सोलापूर येथील एका बँकेत ‘ॲरिस्टोन मल्टीकेअर प्रा. लि.’ या कंपनीच्या नावाने बनावट खाते उघडून त्यामध्ये २५ लाख रुपये आरटीजीएसद्वारे जमा करण्यास भाग पाडले. त्यानंतर विविध कारणे सांगत तक्रारदारांकडून आणखी ३० लाख रुपये घेण्यात आले.

याचबरोबर खरेदीखत करायचे असल्याचे सांगून १ कोटी ३५ लाख रुपये रोख स्वरूपात स्वीकारण्यात आले. त्यानंतर संबंधित जमीनमालक बालकिशन गुप्ता हे जिवंत असतानाही ते मयत झाले असल्याचे खोटे सांगून व्यवहार पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे तक्रारदार उंद्रे यांनी पैसे परत मागितले असता, आरोपींनी टाळाटाळ केली. तसेच, पैसे मागण्यासाठी वारंवार गेल्यास गायब करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

 

Web Title : पुणे: सेवानिवृत्त एसीपी ने व्यवसायी को ₹2.5 करोड़ का चूना लगाया

Web Summary : पुणे में एक सेवानिवृत्त एसीपी ने व्यवसायी को जमीन के सौदे में फायदा दिलाने का वादा करके ₹2.4 करोड़ की धोखाधड़ी की। आरोप है कि पूर्व अधिकारी ने फर्जी खाते खोले और पैसे मांगने पर व्यवसायी को धमकी दी। पुलिस ने एसीपी के परिवार सहित पांच लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Pune Businessman Duped of ₹2.5 Crore by Retired ACP

Web Summary : A Pune businessman was defrauded of ₹2.4 crore by a retired ACP promising lucrative land deals. The ex-officer allegedly opened fake accounts and issued threats when the businessman asked for his money back. Police have registered a case against five people including the ACP's family.