Baramati bypoll election: ‘२०२९ला पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’?’ रोहित पवारांचे संकेत; बारामतीत राजकीय चर्चा रंगली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 19:42 IST2026-04-23T19:41:52+5:302026-04-23T19:42:20+5:30
Baramati bypoll election : पूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही अशी लढत झाली आहे. मात्र, पवार कुटुंब एकत्र यावे ही लोकांची इच्छा आहे.

Baramati bypoll election: ‘२०२९ला पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’?’ रोहित पवारांचे संकेत; बारामतीत राजकीय चर्चा रंगली
बारामती : आगामी २०२९च्या निवडणुकीत बारामतीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सूचक विधान आमदार रोहित पवार यांनी करत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घ्यावा लागतो, त्यामुळे परिस्थिती काहीही वळण घेऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘बारामतीतून उमेदवार कोण द्यायचा हा संबंधित पक्षाचा निर्णय असतो. आमचे पक्ष वेगळे आहेत. जय पवार उमेदवार असतील तर युगेंद्र पवारही उमेदवार असू शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘पूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही अशी लढत झाली आहे. मात्र, पवार कुटुंब एकत्र यावे ही लोकांची इच्छा आहे. अजितदादांच्या काळात विलीनीकरण झाले असते तर २०२९ मध्ये ते मुख्यमंत्री झाले असते,’ अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
दरम्यान, जय पवार यांनीही २०२९ मध्ये उमेदवारीबाबत लोकांची अपेक्षा असल्याचे म्हटले असले, तरी स्वतःला पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम करायचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
पवार विरुद्ध पवार लढत नको : युगेंद्र पवार
‘रोहित पवार यांनी व्यक्त केलेले मत त्यांचे वैयक्तिक असू शकते. यापूर्वी पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली, त्याचे दुःख आहे. आता आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो आहोत. पुन्हा अशी लढत होऊ नये, ही आमची इच्छा आहे,’ असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्ता म्हणूनच राहाणार : जय पवार
‘बारामतीकरांना मी २०२९ मध्ये उमेदवार असावे असे वाटते, ही लोकांची भावना आहे. मात्र मला पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम करायचे आहे,’ असे जय पवार यांनी सांगितले. तसेच विमान अपघाताच्या चौकशीबाबत बोलताना त्यांनी, ‘अहवालासाठी एक वर्ष लागू शकते. सत्य समोर येईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणार नाही,’ असेही स्पष्ट केले.
श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केली नाराजी
२०२९ च्या निवडणुकीच्या वक्तव्याबाबत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधु श्रीनिवास पवार यांनी नाराजी व्यक्त केली.आज मतदानाचा दिवस आहे.आज बोलायच्या या गोष्टी नाहित.या गोष्टी काढायची देखील आज गरज नाही. जय पवार आणि रोहित पवार यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले,दाेघांनी या गोष्टीवर बोलायची गरज नव्हती.आणखी फार लांब जायचे आहे.आज फार महत्वाचा दिवस आहे.आपण सगळ पुढे होवून दादांसाठी सगळ करीत आहे.कोणीही विरोधात उभा राहिलेला नाही.सर्व परीवाराचा संवाद आहे.राजकारण म्हणुन पवारसाहेबच निर्णय घ्यायचे. साठ वर्षांपासून हे तेच ठरवितात. साहेबांची तब्येत बरी नव्हती, ते एखाद्या दिवशी दाेघांना बोलतील. साहेबांना न विचारता त्या दोघांनी हे वक्तव्य केल्याने ते बोलतील, असेही श्रीनिवास पवार म्हणाले.