Baramati Bypoll Election: बारामती पोटनिवडणूक शांततेत; रात्री उशिरापर्यंत ५८.२७ टक्के मतदानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 12:29 IST2026-04-24T12:29:33+5:302026-04-24T12:29:49+5:30
Baramati Bypoll Election आता या निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार असून, मताधिक्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे

Baramati Bypoll Election: बारामती पोटनिवडणूक शांततेत; रात्री उशिरापर्यंत ५८.२७ टक्के मतदानाची नोंद
बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत रात्री उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे ५८.२७ टक्के मतदानाची नोंद झाली. या निवडणुकीत पवार यांच्यासह एकूण २३ उमेदवार रिंगणात असले तरी विरोधकांकडून प्रभावी लढत नसल्याने निवडणूक मोठ्या प्रमाणावर एकतर्फी झाल्याचे चित्र दिसून आले.
सकाळी सुरुवातीच्या सत्रात मतदानाचा वेग मंद होता. सकाळी नऊ वाजेपर्यंत केवळ ८.१ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर हळूहळू वाढ होत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के, दुपारी एक वाजेपर्यंत ३१.९१ टक्के, तर दुपारी तीन वाजेपर्यंत ४०.३६ टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही टक्केवारी ५२.४४ पर्यंत पोहोचली. तर रात्री उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ५८.२७ टक्क्यांपर्यंत ही आकडेवाडी गेली. मतदान प्रक्रियेत प्रमुख नेत्यांनीही सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या दोन्ही पुत्रांसह काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेट देत मतदारांशी संवाद साधला. जय पवार दिवसभर विविध केंद्रांवर फिरून परिस्थितीचा आढावा घेत होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबीयांसह शहरातील रिमांड होम येथील मतदान केंद्रावर मतदान केले, तर युगेंद्र पवार व त्यांच्या कुटुंबीयांनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला.
मतदानापूर्वी सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत अभिवादन केले, तसेच मातोश्री आशाताई पवार यांचे आशीर्वाद घेतले. दरम्यान, यंदा राष्ट्रवादी काँग्रेसने ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्यासाठी जोरदार प्रयत्न केले असले तरी प्रखर उन्हाळा आणि एकतर्फी लढतीमुळे मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचे निरीक्षण व्यक्त होत आहे. आता या निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी जाहीर होणार असून, मताधिक्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.