पुरंदरमधील शेतकऱ्यांना सरासरी प्रति एकरी २ कोटींचा दर; १० जूनपर्यंत करारनामे होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:37 IST2026-05-06T12:36:45+5:302026-05-06T12:37:01+5:30

ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये करण्यात आलेल्या मोजणीदरम्यान ९६ टक्के शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दर्शविली आहे

Average rate of Rs 2 crore per acre for farmers in Purandar; Agreements will be signed by June 10 | पुरंदरमधील शेतकऱ्यांना सरासरी प्रति एकरी २ कोटींचा दर; १० जूनपर्यंत करारनामे होणार

पुरंदरमधील शेतकऱ्यांना सरासरी प्रति एकरी २ कोटींचा दर; १० जूनपर्यंत करारनामे होणार

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाचा अंतिम दर १ कोटी ६१ लाख रुपये निश्चित केला आहे. गुरुवारपासून (दि. ७) प्रत्यक्ष भूसंपादन-करारनाम्याला सुरुवात होईल. जमीन मोजणीवेळी ९६ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली असली तरी प्रत्यक्ष भूसंपादनावेळीही संमती आवश्यक आहे.

१० जूनपर्यंत संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकरी सरासरी दोन कोटी रुपयांचा मोबदला मिळेल. संमती न दिलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने संपादित होणार आहेत. मोबदल्यासाठीचा दर राज्य सरकारने विशेष बाब म्हणून निश्चित केला असून यात आता कोणताही बदल होणार नाही. भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यानंतर निविदा काढण्यात येणार असून विमानतळाचे काम ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

डुडी म्हणाले, “पुरंदर विमानतळासाठी गेल्यावर्षी एप्रिलमध्ये अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये करण्यात आलेल्या मोजणीदरम्यान ९६ टक्के शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दर्शविली होती. त्यानुसार १ हजार २१६ हेक्टर अर्थात सुमारे ३ हजार एकर जमीन विमानतळासाठी घेण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. या भूसंपादनाचा प्रस्ताव एमआयडीसीकडे पाठविण्यात आला. त्याला ९ फेब्रुवारी रोजी मान्यता देण्यात आली. भूसंपादनापोटीच्या मोबदल्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केल्यानंतर त्यासंदर्भातील दर निश्चिती नुकतीच करण्यात आली.”

यासाठी तालुक्यातील सात गावांमधील बागायती क्षेत्रासह जिरायत जमिनीला गेल्या तीन वर्षांत मिळालेला सरासरी दर लक्षात घेऊन प्रति एकरी १ कोटी ६१ लाख १ हजार ९२५ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये अधिसूचना जारी झाल्यापासून आजवर मोबदल्याच्या रकमेवरील व्याजदेखील समाविष्ट करण्यात आले आहे. हे व्याज प्रति एकरी सुमारे ८ लाख रुपये इतके आहे. शेतात असणारी वनझाडे, फळझाडे, विहिरी, बोअरवेल, पाईपलाईन, घरे, पोल्ट्री याचेही मूल्य काढून हा दर निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार काही शेतकऱ्यांना सुमारे सव्वादोन कोटी रुपये प्रति एकर मोबदला मिळणार आहे, तर काही शेतकऱ्यांना १ कोटी ६१ लाखांपर्यंत मोबदला मिळेल. बहुतांश शेतकऱ्यांना सरासरी सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंत मोबदला मिळणार आहे. हा दर सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत चारपटीहून अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.

येत्या गुरुवारपासून प्रत्यक्ष करारनामे करण्यास सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया १० जूनपर्यंत सुरू राहणार असून त्या दरम्यान करारनामा पूर्ण होणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला आरटीजीएसद्वारे थेट खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या रकमेवर कोणतेही व्याज आकारण्यात येणार नाही. तसेच संपूर्ण रक्कम रोख जमा करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी करारनामे केले नाहीत अशांच्या जमिनी १० जूननंतर सक्तीने संपादित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

करारनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सासवड येथील उपविभागीय कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी नऊ पथके नेमण्यात आले असून भूसंपादन अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकारी, बँकेचे प्रतिनिधी, सेतू केंद्र चालक यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मोबदला खात्यावर जमा करण्यासाठी कर्जबोजा, थकबाकी, मालमत्तेचा दावा या स्वरूपाची कागदपत्रे द्यावी लागणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

संपादनासाठी उशिरा संमती दिल्यास दर वाढवून मिळेल असा गैरसमज काही शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र, ही अफवा आहे. राज्य सरकारकडून यानंतर कोणताही वाढीव मोबदला मिळणार नाही. सर्वांना सारखा दर देण्यात येणार असून प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्त्वावर करारनामे करावेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी.

संपादित होणारी जमीन

उदाचीवाडी ५८.३४
वनपुरी १५४.०६

कुंभारवळण २४५.४८
खानवडी २६९.२२

मुंजवडी ८२.५६
एखतपूर १९९.०३

पारगाव १८८.०७

 

Web Title : पुरंदर के किसानों को मिलेगा ₹2 करोड़ प्रति एकड़; 10 जून तक समझौते

Web Summary : पुरंदर में हवाई अड्डे की परियोजना के लिए किसानों को औसतन ₹2 करोड़ प्रति एकड़ मिलेगा। समझौते 10 जून तक होने हैं। दर ₹1.61 करोड़ प्रति एकड़ है, साथ ही ब्याज और संरचनाओं के लिए मुआवजा भी शामिल है।

Web Title : Purandar Farmers to Get ₹2 Crore Per Acre; Agreements by June 10

Web Summary : Farmers in Purandar will receive an average of ₹2 crore per acre for land acquired for the airport project. Agreements are due by June 10th. The rate is ₹1.61 crore per acre, plus interest and compensation for structures.