Pune Crime: किरकोळ कारणावरून वाद; पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून आत्येभावाने केला खून, पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 16:14 IST2026-04-20T16:13:11+5:302026-04-20T16:14:33+5:30
रोहन काही काम धंदा करत नसून तो यु ट्युबवर रील बनवायचा, त्याचाशी झालेल्या किरकोक वादातून आत्येभावाने खून केला

Pune Crime: किरकोळ कारणावरून वाद; पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून आत्येभावाने केला खून, पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : किरकोळ कारणावरून आत्याच्या मुलाने मित्राच्या मदतीने तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक व लाकडी पट्टीने मारहाण करुन खून केला. रोहन कांतीलाल ओव्हाळ (वय २८, रा. काकडे वस्ती, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर कौशल लांडगे (वय २०, रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आत्याच्या मुलाचे नाव आहे. त्याचा साथीदार अंश पटेल (वय १८) याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बिबवेवाडी - कोंढवा रोडवरील अश्विनी पॅराडाईस सोसायटीजवळ सोमवारी (दि. २०) पहाटे पावणे पाचच्या सुमारास घडली. याबाबत रोहन ओव्हाळच्या बहिणीने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन ओव्हाळ हा काही काम धंदा करत नाही. तो यु ट्युबवर रील बनवायचा. कौशल लांडगे हा त्याचा आत्येभाऊ आहे. त्यांच्यात काही कारणावरून भांडणे झाली होती. त्यावेळी कौशल व अंश पटेल यांनी पेव्हर ब्लॉकने आणि लाकडी पट्टीने रोहनच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. मार्केटयार्ड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन कौशल लांडगे याला अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत जगताप करत आहेत.