पुणे : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूलबसच्या धडकेत पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात घडली. या अपघातात बालकाची आई गंभीर जखमी झाली. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी स्कूलबस चालकाला अटक केली आहे. याप्रकरणी मोडक इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक, मुख्याध्यापकांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईनाथ तुळशीराम भंगारे (५) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. या अपघातात साईनाथची आई रेखा तुळशीराम भंगारे (२८, रा. गणराज हाईट्स, उरूळी देवाची) गंभीर जखमी झाल्या आहेत. रेखा यांनी याबाबत फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी स्कूलबसचा चालक संस्कार अनिल भोसले (रा. पांडवनगर, वडकी, हडपसर-सासवड रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मोडक इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक संजय वसंत मोडक, मुख्याध्यापिका डाॅ. आरती जाधव, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या मालक मनीषा संजय मोडक यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ हा ऊरळी देवाची परिसरातील एका शाळेत शिशूगटात होता. मंगळवारी (दि. २) सकाळी साडेसातच्या सुमारास रेखा मुलाला घेऊन शाळेत सोडण्यासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी धनगर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या स्कूलबसने रेखा आणि साईनाथ यांना धडक दिली. साईनाथ बसच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला. बसच्या धडकेत रेखा जखमी झाल्या. या अपघातानंतर साईनाथ आणि रेखा यांना नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच साईनाथ याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच फुरसुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेश खांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक निरीक्षक किशोर पवार पुढील तपास करत आहेत.
संतप्त नातेवाईकांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी साईनाथचा मृतदेह पोलिस ठाण्यात नेला. फुरसुंगी भागातील एका शाळेची ही बस असल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांनी शाळेचे प्रशासन, संस्था चालक, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूलबस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नातेवाईकांच्या आक्रोशामुळे परिसरात शोककळा पसरली.
Web Summary : A school bus fatally struck a 5-year-old in Pune; the child's mother was seriously injured. Police arrested the bus driver and filed charges against school officials.
Web Summary : पुणे में एक स्कूल बस ने 5 वर्षीय बच्चे को कुचल दिया; बच्चे की माँ गंभीर रूप से घायल हो गई। पुलिस ने बस चालक को गिरफ्तार कर स्कूल अधिकारियों के खिलाफ मामला दर्ज किया।