पतंग उडवताना तोल जाऊन १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; पुण्यातील दुःखद घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 20:32 IST2026-01-10T20:32:40+5:302026-01-10T20:32:56+5:30
गृहप्रकल्पातील इमारतीत पतंग उडवण्यासाठी गेला असताना जिन्यांना कठडे नसल्याने सहाव्या मजल्यावरून तोल जाऊन तो खाली पडला

पतंग उडवताना तोल जाऊन १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; पुण्यातील दुःखद घटना
पुणे : पतंग उडवण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव खुर्द परिसरात घडली. बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप असून, याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्लोक नितीन बांदल (१२, रा. स्वरा क्लासिक इमारत, सिद्धिविनायक सोसायटी, आंबेगाव खुर्द) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत त्याचे मामा अमोल सुभाष इंगवले यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बांधकाम व्यावसायिक योगेश शिळीमकर आणि महेश धूत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ८) शाळा सुटल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास श्लोक घराजवळ सुरू असलेल्या गृहप्रकल्पातील इमारतीत पतंग उडवण्यासाठी गेला होता. इमारतीतील जिन्यांना कठडे नसल्याने सहाव्या मजल्यावरून तोल जाऊन तो खाली पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन चोरमले आणि सहायक निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बांधकाम सुरू असताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळेच हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याने बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे करत आहेत.