CoronaVirus News: अजितदादा... हे असं वागणं बरं नव्हं; प्रचारात कायदा पायदळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 03:14 AM2021-04-10T03:14:47+5:302021-04-10T07:22:08+5:30

व्यापाऱ्यांवर गुन्हे, नेत्यांना मात्र मुभा

CoronaVirus News covid prevention guidelines Violated in ncp leader ajit pawars meeting | CoronaVirus News: अजितदादा... हे असं वागणं बरं नव्हं; प्रचारात कायदा पायदळी

CoronaVirus News: अजितदादा... हे असं वागणं बरं नव्हं; प्रचारात कायदा पायदळी

Next

पंढरपूर : गेल्या २०दिवसांत पंढरपूर तालुक्यात तब्बल ११०० रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे, गेल्या आठवड्यात येथील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत सर्व नियम धाब्यावर बसवून गर्दी जमविल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरीही सर्वच पक्षांच्या नेत्यांमध्ये कोरोनाची कसलीच भीती नसल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे. 

किमान उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी तरी अशा नियमबाह्य गर्दीत भाषण ठोकण्यापूर्वी विचार करायला हवा होता. चार ग्राहक एकत्र येऊ नयेत म्हणून आमच्या पोटावर पाय देणाऱ्या प्रशासनाला राजकीय नेत्यांची भाऊगर्दी कशी काय चालते, असा सवालही जिल्ह्यातील संतप्त व्यापारी विचारू लागले आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला गुरुवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. यामुळे या कार्यक्रमासाठी परवानगी घेणारे राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात भादंवि १८८ अन्वये गुन्हा नोंदला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत गर्दी केल्याने आठ दिवसांत हा तिसरा गुन्हा आहे. मतदान १७ एप्रिल रोजी होणार असून रोजच प्रचाराचा धुराळा उडत आहे.

सोशल मीडियावर टीका
अजित पवार उपमुख्यमंत्री आणि राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या गर्दी होतच असते. परंतु सध्याच्या कोरोना काळात मनात आणले असते तर अजितदादा हे गर्दी टाळू शकले असते. सध्या राज्य सरकारने विवाहासाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींचे बंधन घालून दिले आहे. अशा सामाजिक अंतराचे नियम पाळण्याच्या दिवसामध्ये ही गर्दी केल्यामुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.
पंढरपूर तालुक्यात गेल्या २० दिवसांत १ हजार १७० पॉझिटिव्ह रुग्ण, तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. बैठका, सभा यांमुळे संसर्ग वाढत असल्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. २६ मार्चनंतर पंढरपुरात रुग्ण वाढत गेले. ४ एप्रिलनंतर ही वाढ वेगाने होताना दिसत आहे.

पंढरपूरने गमावले अनेक नेते : पंढरपूर तालुक्याने आतापर्यंत मोठे राजकीय नेते कोरोनामुळे गमावले आहेत. आमदार भारत भालके, माजी आमदार सुधाकर परिचारक, राष्ट्रवादीचे नेते राजूबापू पाटील यांच्यासह अनेकांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. सध्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यातून एका नेत्यालाही बाधा झाली आहे. अशातही प्रचारसभांना विनामास्क मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: CoronaVirus News covid prevention guidelines Violated in ncp leader ajit pawars meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.