पिंपरी : पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना सोमवारी (दि. ४) दुपारी दोनच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील ४१३ क्रमांकाच्या खांबाचा लोखंडी सांगाडा अचानक कलंडला. मात्र, तीन क्रेनच्या सहाय्याने सांगाडा पुन्हा उभा केला आहे, त्यामुळे दुर्घटना टळली.चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकात मेट्रोचे खांब उभारण्याचे काम सुरू आहे. पिंपरी ते निगडीतील भक्ती - शक्ती चौक या ४.४१ किलोमीटरच्या विस्तारीत मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या टप्प्यावरील सुमारे ५०% काम पूर्ण झाले आहे. आज दुपारी सांगाडा जमिनीकडे कलंडत असताना दोन क्रेनच्या मदतीने आधार दिला. तिसरी क्रेन मागवून सांगाड्याला केबलच्या साहाय्याने धरून ठेवले. हा गोंधळ सुरू असताना काही अंतरावरून वाहनांची वर्दळ सुरूच होती.
अधिकाऱ्यांना अंधारात ठेवले
घटना दुपारी घडली असताना ठेकेदार व साइटवर उपस्थित मेट्रोच्या अभियंत्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती दिली नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी विचारणा केली, तेव्हाच त्यांना या घटनेची माहिती मिळाली. अधिकाऱ्यांनी साइटवरील अभियंत्यांना विचारणा केली असता, ‘सांगाडा उभा करण्याचे काम सुरू आहे’, अशी माहिती देण्यात आली.
अनाकलनीय उत्तरे
“ही आमच्या नियमित कामात घडलेली घटना आहे आणि वाऱ्याच्या वेगामुळे सांगाडा कलंडला होता,” असे उत्तर येथील अभियंत्याने दिले. दरम्यान, याबाबत नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर महावीर चौकातील ट्रॅफिक वॉर्डनने सांगितले की, आम्ही दुपारी दोन वाजता कामावर आलो, त्यावेळी हा सांगाडा झुकलेला होता. या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मेट्रो प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मी येथून जात असताना मेट्रोचा सांगाडा खाली झुकलेला पाहिला. सांगाडा कधी खाली कोसळेल, अशी भीती वाटत होती. - राजेश जाधव, रिक्षाचालक
सांगाडा झुकत असल्याचे लक्षात येताच मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या साहाय्याने काम सुरू केले. त्यामुळे वाहतूक बंद करण्याची वेळ आली नाही. - अमित डोळस, पोलिस निरीक्षक, पिंपरी वाहतूक विभाग
मेट्रोच्या स्तंभाचा सांगाडा थोडासा कलंडला होता. मात्र, क्रेनच्या सहाय्याने काही वेळातच तो पूर्ववत करण्यात आला. - चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, पुणे मेट्रो