Mamata Banerjee PC After West Bengal Election 2026 Result: मी राजीनामा देण्यासाठी लोकभवनात जाणार नाही. आम्ही पक्षाच्या सदस्यांसोबत आमच्या पुढील रणनीतीवर चर्चा करू. मी भाजपाचे अत्याचार यापुढे सहन करणार नाही. मी पुन्हा रस्त्यावर उतरेन. इंडिया आघाडी माझ्यासोबत आहे. सोनिया गांधी यांनी मला फोन केला. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन आणि तेजस्वी यादव या सर्वांनी माझ्याशी संपर्क केला. इंडिया आघाडी माझ्यासोबत असल्याचे त्यांनी मला सांगितले. अखिलेश यादव उद्या येत आहेत, असे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
प. बंगाल विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी १५ वर्षांपासूनचे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे सरकार पायउतार करीत गेल्या सुमारे ५० वर्षांपासून राज्यात ठराविक काळानंतर सत्तापालट घडवून आणारी एकतर्फी निवडणुकीची परंपरा कायम राखली. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला तब्बल २०६ जागा मिळाल्या. तर तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. भवानीपूर मतदारसंघात सुवेंदू अधिकारी यांनी तब्बल १५ हजार १०५ मतांनी ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव केला. सुवेंदू अधिकारी यांना एकूण ७३ हजार ९१७ मते मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना ५८ हजार ८१२ मतांवर समाधान मानावे लागले. यानंतर आता मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार टीका करत अनेक गंभीर आरोपही केले.
भाजपाने आम्हाला हरवण्यासाठी शक्य असलेले प्रत्येक डावपेच वापरले
आम्ही निवडणूक हरलेलो नाही, आमचा पराभव करण्यात आला आहे. भाजपाने जिंकण्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर केला. आमची लढाई भाजपाशी नव्हती, तर निवडणूक आयोगाशी होती. मी माझ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नाही. २००४ पासून मी असे अत्याचार पाहिले नाहीत. निवडणूक आयोग हाच मुख्य खलनायक आहे. SIR मधून ९० लाख मते काढून टाकण्यात आली. भाजपाने १०० जागा चोरल्या आहेत. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आम्हाला हरवण्यासाठी हातमिळवणी केली. भाजपाने आम्हाला हरवण्यासाठी शक्य असलेले प्रत्येक डावपेच वापरले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला, या शब्दांत ममता बॅनर्जी यांनी निशाणा साधला.
भाजपाने आमच्या लोकांचा छळ करायला सुरुवात केली आहे
आता मी मुक्त आहे. मला काही काम करायचे आहे. पण आम्ही लढा थांबवणार नाही. भाजपाने आमच्या लोकांचा छळ करायला सुरुवात केली आहे. त्यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबांवरही हल्ला केला आहे. भाजपाने अत्याचार करण्याची धमकी दिली. भाजपने आपल्या गुंडांमार्फत हल्ले चढवले आहेत. पोलीस नुसतेच बसून आहेत. आम्ही 'आम्हाला बदल हवा, सूड नको' अशी घोषणा दिली. ही सैनिकांची फौज आहे की गुंडांची? अशी विचारणा ममता बॅनर्जी यांनी केली.
महाराष्ट्र, बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची हत्या
महाराष्ट्र आणि बिहारप्रमाणे आता पश्चिम बंगालमध्येही लोकशाहीची हत्या झाली आहे. इंडिया आघाडी एकजूट आहे आणि माझ्यासोबत आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर, भाजपा अनेक जागांवर आघाडीवर असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी द्यायला सुरुवात केली. भाजपाच्या गुंडांनी धक्काबुक्की केली, मारहाण केली. जेव्हा मी बूथवर पोहोचले, तेव्हा सीएपीएफने मला आत जाऊ नका असे सांगितले. मी आरओकडे लेखी तक्रार दाखल केली. पण आम्ही परत येऊ. आम्ही लढू, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.
दरम्यान, गैरप्रकारांमुळे आमचा पराभव झाला आहे. आम्ही यावर कारवाई करत आहोत. आम्ही १० सदस्यीय सत्यशोधक समिती स्थापन केली आहे. ज्या ठिकाणी आमच्या पक्षाची कार्यालये ताब्यात घेण्यात आली, त्या सर्व ठिकाणी हे पथक भेट देईल. अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आली. आम्ही हरलेलो नाही. भाजपाने हा विजय चोरला आहे. केंद्रीय सुरक्षा दलांना असे वागताना मी कधीही पाहिले नाही, असे ममता दीदी यांनी म्हटले आहे.
Web Summary : Mamata Banerjee rejects resignation, claiming BJP rigged Bengal elections. Despite TMC's loss with 80 seats, she alleges electoral malpractices and vows to fight back. India alliance supports her. She accuses BJP of violence and misusing election commission.
Web Summary : ममता बनर्जी ने इस्तीफे से इनकार किया, बंगाल चुनावों में भाजपा पर धांधली का आरोप लगाया। टीएमसी की 80 सीटों के साथ हार के बावजूद, उन्होंने चुनावी कदाचार का आरोप लगाया और वापस लड़ने की कसम खाई। भारत गठबंधन का समर्थन। उन्होंने भाजपा पर हिंसा का आरोप लगाया।