Mamata Banerjee Press Conference, West Bengal Assembly Election 2026: पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. पश्चिम बंगालच्या एकूण २९४ जागांपैकी २०६ जागांवर भाजपने विजय मिळवला. १५ वर्ष बंगालवर राज्य करणाऱ्या तृणमूल काँग्रेसला शंभरीही गाठता आली नाही, त्यांना केवळ ८० जागांवरच समाधान मानावे लागले. विशेष बाब म्हणजे, मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे सुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना १५,१०५ मतांनी पराभूत केले. या धक्कादायक पराभवानंतर ममतादीदींनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन काही गंभीर आरोप केले.
पोटात लाथा मारल्या...
ममता बॅनर्जी आणि भाजपचे सुवेंदु अधिकारी यांच्यात भवानीपूर विधानसभेत लढत झाली. सोमवारी मतमोजणीच्या वेळी ममता बॅनर्जी काही वेळ आघाडीवर होत्या. त्यानंतर मात्र त्या सातत्याने पिछाडीवर पडताना दिसत होते. हळूहळू मतांमधील अंतर वाढू लागल्यावर ममता बॅनर्जी स्वत: मतमोजणी केंद्रावर आल्या आणि त्यांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना आतमध्ये जाऊ देण्यात आले नाही. यावेळी घडलेल्या घटनांवरून ममतदीदींनी अतिशय गंभीर आरोप केले. "मी मतमोजणी केंद्रावर गेले होते तेव्हा मला अडवण्यात आले. माझ्या पोटात आणि पाठीवर लाथा मारण्यात आल्या. त्यावेळी सीसीटीव्ही बंद होते. त्यानंतर त्यांनी मला धक्के मारून मतमोजणी केंद्रावरून बाहेर ढकलून दिले. मी महिला असूनही माझ्याशी अतिशय वाईट वागणूक करण्यात आली. केंद्रीय यंत्रणा आणि सीआरपीएफचे जवान मतमोजणी केंद्रावर गुंडांसारखे वागत होते" असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.
राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही...
"आम्ही निवडणूक हरलेलो नाही, आमचा पराभव करण्यात आला आहे. मी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. भाजपाने जिंकण्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर केला. आमची लढाई भाजपाशी नव्हती, तर निवडणूक आयोगाशी होती. मी माझ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नाही. २००४ पासून मी असे अत्याचार पाहिले नाहीत. निवडणूक आयोग हाच मुख्य खलनायक आहे. SIR मधून ९० लाख मते काढून टाकण्यात आली. भाजपाने १०० जागा चोरल्या आहेत. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आम्हाला हरवण्यासाठी हातमिळवणी केली. भाजपाने आम्हाला हरवण्यासाठी शक्य असलेले प्रत्येक डावपेच वापरले." या शब्दांत ममता बॅनर्जी यांनी निशाणा साधला.
Web Summary : Mamata Banerjee alleges she was assaulted at the counting center and unfairly ousted. She accuses BJP and the Election Commission of conspiring to defeat her in the West Bengal elections, claiming manipulation and stolen votes.
Web Summary : ममता बनर्जी ने मतगणना केंद्र पर हमले का आरोप लगाया और कहा कि उन्हें जबरदस्ती बाहर निकाला गया। उन्होंने भाजपा और चुनाव आयोग पर पश्चिम बंगाल चुनाव में हराने की साजिश का आरोप लगाया, जिसमें हेरफेर और चोरी के वोटों का दावा किया गया।