1 / 10धकाधकीच्या आयुष्यातून थोडा विसावा घ्यायचा असेल आणि डोळ्यांना सुखावणारी हिरवळ पाहायची असेल, तर केरळमधील 'वायनाड' हे पर्यटकांच्या यादीतलं पहिलं नाव असायला हवं. चहा-कॉफीचे मळे, धुके साचलेले डोंगर आणि पांढरे शुभ्र धबधबे यामुळे वायनाडला पर्यटकांचे नंदनवन मानले जाते. नीलगिरी बायोस्फीअर रिझर्व्हचा एक महत्त्वाचा भाग असलेले वायनाड केवळ शांततेसाठीच नाही, तर साहसी पर्यटनासाठीही प्रसिद्ध आहे.2 / 10वायनाड हे केरळमधील एक असे हिल स्टेशन आहे, जिथे तुम्हाला डोंगरदऱ्या, गुहा, घनदाट जंगल आणि नैसर्गिक तलाव एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. येथील मसाल्यांचे मळे, विशेषतः वेलची आणि काळी मिरी यांचा सुगंध हवेत दरवळत असतो. कॉफीच्या बागांमधून फिरताना मिळणारा अनुभव अविस्मरणीय असतो.3 / 10मुथंगा वन्यजीव अभयारण्य: प्राणीप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे पर्वणीच! जंगल सफारी दरम्यान येथे हत्ती, हरण आणि विविध प्रकारचे पक्षी सहज पाहायला मिळतात.4 / 10बाणासुर सागर धरण: हे भारतातील मातीचे सर्वात मोठे धरण आहे. या धरणाच्या जलाशयात छोटी-छोटी बेटे आहेत, जी स्पीड बोटिंग करताना अतिशय सुंदर दिसतात.5 / 10मीनमुट्टी धबधबा: वायनाडमधील हा सर्वात मोठा धबधबा तीन टप्प्यांत खाली कोसळतो. जंगलातून पायवाटेने येथे पोहोचणे हा एक थरारक अनुभव असतो.6 / 10पुकोट तलाव : चहुबाजूंनी जंगल आणि डोंगररांगांनी वेढलेला हा तलाव अतिशय शांत आहे. येथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.7 / 10एडक्कल गुहा : इतिहासाची आवड असेल तर या गुहांना नक्की भेट द्या. येथे अश्मयुगातील कोरीव काम पाहायला मिळते. इथपर्यंत पोहोचण्यासाठी थोडं ट्रेकिंग करावं लागतं, पण वरून दिसणारा नजारा तुमचं सगळं श्रम विसरवून देतो.8 / 10वायनाडमध्ये राहण्यासाठी स्वस्त दरात हॉटेल्स उपलब्ध आहेत. साधारण १५०० रुपयांपासून रूम्स मिळायला सुरुवात होते. चांगल्या दर्जाच्या हॉटेलसाठी प्रति रात्र २ ते ३ हजार रुपये खर्च येऊ शकतो. जेवणाचा खर्च प्रति व्यक्ती दिवसाला ६०० ते १००० रुपयांपर्यंत होतो.9 / 10जर तुम्ही ३ दिवस आणि ३ रात्रींचा प्लॅन केला, तर रेल्वेने प्रवास केल्यास साधारण १८ ते २० हजार रुपयांत तुमची ट्रिप पूर्ण होऊ शकते. विमानाने प्रवास करायचा असल्यास हा खर्च ३३ ते ३५ हजार रुपयांच्या घरात जाऊ शकतो.10 / 10वायनाडला जाण्यासाठी थेट विमान किंवा रेल्वे सुविधा नाही. तुम्हाला सर्वात आधी केरळमधील 'कालिकत' (कोझिकोड) येथे पोहोचावे लागेल. कालिकतपासून वायनाड साधारण ८५ ते ९० किलोमीटर अंतरावर आहे. तेथून तुम्ही बस किंवा खाजगी टॅक्सीने निसर्गरम्य घाटातून वायनाडला पोहोचू शकता.