रमेश रेड्डी हत्या प्रकरण: ‘तो' पळत होता… पण संशयित थांबले नाहीत..! २१ गोळ्यांनी देहूरोड हादरलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 14:18 IST2026-04-30T14:15:29+5:302026-04-30T14:18:28+5:30
जीव वाचवण्यासाठी पळाला, तरी पाठलाग करून गोळ्या झाडल्या

रमेश रेड्डी हत्या प्रकरण: ‘तो' पळत होता… पण संशयित थांबले नाहीत..! २१ गोळ्यांनी देहूरोड हादरलं
पिंपरी : तीन महिन्यांपूर्वी धमकी देऊन पाळत ठेवून संशयितांनी रमेश रेड्डी (रा. देहूरोड) याचा भर रस्त्यात खून केला. रमेश आणि त्याचा मित्र मंगळवारी (दि. २८ एप्रिल) रात्री देहूरोड येथील संतोष स्वीट मार्टच्या मागील कपड्यांच्या दुकानात गेले होते. कपडे घेऊन दुचाकी सुरू करत असतानाच मोटारीतून आणि दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी त्यांना घेरले. संशयितांच्या हातात पिस्तूल आणि कोयता होता.
संशयितांनी शिवीगाळ करत रमेश रेड्डीकडे धाव घेतली. परिस्थिती ओळखताच रमेश आणि त्याच्या मित्राने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, गोळीबाराचा आवाज होताच परिसरातील नागरिक भीतीने सैरावैरा पळू लागले. रमेश जीव वाचवण्यासाठी धावत सुटला. तरीही संशयितांनी त्याचा पाठलाग करत पाठीमागून गोळ्या झाडल्या.
प्राथमिक माहितीनुसार, त्याच्यावर २१ गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील नऊ गोळ्या शरीरात लागल्या. त्यानंतर डोक्यात कोयत्याने वार करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला प्रथम देहूरोड येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी पिंपरीतील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
रमेशला रात्री वायसीएम रुग्णालयात आणताच मोठ्या प्रमाणावर समर्थक, नातेवाईक आणि नागरिकांची गर्दी झाली. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी शांततेचे आवाहन करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
नगरसेवकावरही झाला होता गोळीबार
देहूरोड परिसरात सात वर्षांपूर्वी याच चौकात तत्कालीन एका नगरसेवकावर गोळीबार झाला होता. आता त्याच ठिकाणी रमेश रेड्डीचा खून झाल्याने भीतीचे वातावरण आहे.
वर्षभरात दोन्ही भावांचा खून
रमेश आणि त्याचा भाऊ विक्रम यांचे बालपण अत्यंत संघर्षमय होते. हातगाडीवर इडली विक्री करून त्यांच्या आईने कुटुंबाचा सांभाळ केला. रमेशचा भाऊ विक्रम रेड्डी १३ फेब्रुवारी २०२५ रोजी वाढदिवसाच्या कार्यक्रमात गेला होता. त्यावेळी तेथे आलेल्या संशयितांनी वाद घालून गोळीबार करून त्याचा खून केला होता. वर्षभरात दोन्ही भावांचे खून झाल्याने देहूरोड हादरले आहे.