पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 09:00 IST2026-05-01T08:59:32+5:302026-05-01T09:00:25+5:30
Pakistan Ship Fraud: पाकिस्तानला जाणारे हे जहाज महाराष्ट्राच्या बंदरात का उभे राहणार आहे? वाचा सविस्तर

पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
Pakistan Ship Fraud: मुंबई उच्च न्यायालयाने तपासणीसाठी महाराष्ट्रातील जयगड बंदरात आणलेल्या 'अमीर गॅस' या जहाजाला जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा आदेश जारी केला असून, पुढील सुनावणीपर्यंत जहाजावरील माल उतरवला जाणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. न्यायालयाने स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, जहाजाने जेएसडब्ल्यू जयगड बंदराची हद्द सोडू नये आणि त्याला बंदरातच ताब्यात ठेवावे. याशिवाय, बंदर प्रशासनाला जहाजाला 'आउटवर्ड पोर्ट क्लिअरन्स' (बाहेर जाण्याची परवानगी) न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जहाजाचा मार्ग बदलला, प्रकरण कोर्टात
या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून मालाची वाहतूक चुकीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. झांग युनियन इंटरनॅशनलने ही तक्रार दाखल केली असून, एलपीजी अमीर गॅस हे प्रतिवादी आहेत. वकिलांच्या म्हणण्यानुसार, जहाजावरील एलपीजी (मिश्रित)चा साठा असलेला माल उतरवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. न्यायालयाने असेही निर्देश दिले आहेत की, जहाजाने भारतीय सागरी हद्द सोडू नये आणि जहाजावरील माल सुरक्षित ठेवावा.
तपासात असेही उघड झाले की, मूळ जहाजाचे दोन मालक असून, प्रत्येकाचे वाहतुकीचे हक्क वेगवेगळे आहेत. हे जहाज गॅसच्या वाहतुकीसाठी भाड्याने घेण्यात आले होते. हा माल मूळतः पाकिस्तानला जाणार होता आणि तो इराकमध्ये जहाजावर चढवण्यात आला होता. पण, नंतर जहाजाचा मार्ग बदलण्यात आला. जहाजाच्या संचालनासंदर्भात झालेल्या वादामुळे, मास्टर (कॅप्टन) बदलण्यात आला आणि दुबईतील नवीन मास्टरला खोटी माहिती देण्यात आली.
खोटी कागदपत्रे दिल्याने गोंधळ वाढला
जयगड बंदरात प्रवेश मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली. मूळ मालकाच्या तक्रारीनंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले, ज्यानंतर न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली आणि जहाज जप्त करण्याचे आदेश दिले. स्थानिक शिपिंग एजंट मिलिंद बनाप यांनी न्यायालयाच्या आदेशाला दुजोरा दिला आहे.